देशविदेश

अबब! गॅस दरवाढीचा भडका; आजपासून गॅस सिलिंडरसाठी मोजावे लागणार एवढे रुपये

मुंबई आधीच कोरोनाच्या संकटाने जनता त्रस्त असताना नागरिकांना महागाईचा मार सहन करावा लागत आहे. त्यामध्ये आता घरगुती वापराच्या गँस सिलींडरची भर पडली आहे. घरगुती वापराच्या १४.२ किलो ग्रॅमच्या गॅस सिलींडरच्या किमतीत आजपासून २५.५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्याशिवाय व्यावसायिक वापराच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत देखील कंपन्यांनी मोठी वाढ केली आहे. १९ किलोचा गॅस सिलिंडर ८४ रुपयांनी महागला आहे. यामुळे मुंबईत आता घरगुती वापराच्या सिलिंडरसाठी ८३४.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

आज १ जुलै २०२१ पासून देशभरत गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती आणि वाणिज्य वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. जागतिक बाजारात इंधन दरवाढीने पेट्रोलियम कंपन्यांवरील दबाव वाढला आहे. त्यामुळे कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा सपाटा लावला आहे.

आज गुरुवारी कंपन्यांनी घरगुती सिलींडरच्या किमतीत २५.५० रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीनंतर मुंबईत १४.२ किलोचा गॅस सिलिंडर ८३४.५ रुपये झाला आहे. तर दिल्लीत ८३४ रुपये, कोलकात्यात ८६१ रुपये आणि चेन्नईत ८५० रुपये झाला आहे. जून महिन्यात मुंबईत घरगुती सिलिंडरचा दर ८२५ रुपये होता.

आज कंपन्यांनी १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ८४ रुपयांची वाढ केली आहे. त्यानुसार १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरचा भाव आता १५०७ रुपये झाला आहे. जून मध्ये तो १४७०.५० रुपये होता तर मे महिन्यात तो १५९५.५० रुपये होता. कंपन्यांनी मे आणि जून महिन्यात या सिलिंडरचा भाव कमी केला होता.

आजच्या दरवाढीनंतर मुंबईत १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडरचा भाव १५०७ रुपये झाला आहे. दिल्लीत या सिलिंडरसाठी ग्राहकांना १५५० रुपये मोजावे लागतील. कोलकात्यात तो १६५१.५० रुपये झाला आहे. तर चेन्नईत १६८७.५ रुपयांना १९ किलोग्रॅमच्या एलपीजी सिलिंडर मिळेल.

सामान्यांना बसतेय दरवाढीची झळ

गेल्या काही महिन्यांत सहा वेळा सिलिंडरच्या किंमतीत वाढ जाहीर करण्यात आली होती. १ जानेवारी २०२१ रोजी घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ६९४ रुपये प्रति सिलिंडर होती. १ मार्च २०२१ पर्यंत ही किंमत ८१९ वर पोहचली होती. एप्रिल महिन्यात त्यात १० रुपयांची कपात करण्यात आली होती. मे महिन्यात सिलिंडरचा भाव ८१० रुपये झाला होता. तर जून महिन्यात कंपन्यांनी घरगुती सिलिंडरच्या दरात कोणताही बदल केला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!