‘कौन बनेगा करोडपती’ मध्ये भोंदूगिरीचा दावा -महाराष्ट्र अंनिसने केला भांडाफोड..
अमिताभ बच्चन यांना चूक दुरुस्त करण्याचे आवाहन

मुंबई:१६ नोव्हेंबर रात्री आणि १७ नोव्हेंबर सकाळी झालेल्या कोन बनेगा करोडपती ह्या प्रसिद्ध टेलिव्हिजन शो मध्ये डोळ्यावर पट्टी बांधून लहान मुलांनी वाचून दाखवल्याचा कथित चमत्कार प्रयोग दाखवण्यात आला. महानायक अमिताभ बच्चन ह्यांच्या समोर हा कथित चमत्कार दाखवल्या मुळे आणि त्यांनी ह्या गोष्टीचे कौतुक केल्यामुळे एक अत्यंत चुकीच्या आणि भोंदूगिरीच्या गोष्टीचा प्रचार समाजात केला गेला .महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीने ह्या घटनेला जोरदार आक्षेप घेतला असून महा अंनिस मार्फत कथित चमत्काराच्या मागची हातचलाखी दाखवणारा व्हिडियो रिलीज करण्यात आला आहे.
ह्या व्हिडीओ मध्ये डोळ्यावर पट्टी बांधून वाचन करणारे महा अंनिस चे कार्यकर्ते दाखवण्यात आले आहेत. विज्ञानच्या नावाखाली केल्या जाणारया ह्या भोंदुगिरीला पालकांनी बळी पडू नये तसेच कोण बनेगा करोडपती ह्या शो ने घडलेल्या गोष्टी बद्दल दिलगिरी व्यक्त करून प्रत्यक्षात ह्या कथित चमत्काराच्या मागचे विज्ञान आपल्या पुढच्या शो मधून लोकांच्या समोर दाखवावे असे आवाहन देखील ह्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आले आहे .महानायक अमिताभ बच्चन यांनी आपली चूक दुरुस्त करावी आणि अशा अवैद्यानिक गोष्टीना आपल्या शो मध्ये थारा देवू नये असे देखील आवाहन ह्या वेळी करण्यात आले आहे.
ह्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हंटले आहे कि,डोळ्यावर पट्टी बांधून गेल्या काही वर्षांच्या मध्ये महाराष्ट्रात तसेच अनेक राज्यांच्या मध्ये मुलांचे मिड ब्रेन अक्टीव्हेशन करून त्यांचा बुध्यांक तसेच स्मरणशक्ती वाढवतो असे दावे करणाऱ्या मार्गदर्शन वर्गांचे पेव फुटले आहे .
मिड ब्रेन(मध्य मेंदू)चे उद्दीपन केल्यामुळे डोळ्यावर पट्टी बांधून देखील मुलांना केवळ स्पर्शाने अथवा वासाने गोष्टी ओळखता येतात असा दावा मिड ब्रेन अक्टीव्हेशनच्या जाहिरातींमधून केला जातो . विज्ञानाच्या नावावर हातचलाखीचा वापर करून मुलांची व पालकांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास होतो ह्या भूल थापेला बळी पडून अनेक पालक हजारो रुपये ह्या मध्ये खर्च करत आहेत हे सर्व थांबवणे आवश्यक आहे असे देखील ह्या पत्रकात नमूद केले आहे.
डोळ्यावर पट्टी बांधली असताना नाक आणि डोळे यांचे मध्ये जी जागा राहते त्यामधून बघून गोष्टी ओळखाल्या जातात . जर हाताने दाब देवून डोळे घट्ट बंद केले अथवा डोळ्यावर आतून काळा रंग दिलेला आणि घट्ट बसणारा पोहण्याचा चष्मा लावला तर ह्या गोष्टी ओळखाता येत नाहीत हे महा अनिस ने अनेक वेळा सिद्ध केले आहे
आजूबाजूला पूर्ण अंधार करून अथवा डोक्याच्या मागच्या बाजूला वस्तू धरली असता मिड ब्रेन अक्टीव्हेशनचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलांना वस्तू ओळखता येत नाहीत. तसेच अंध मुलांना देखील मिड ब्रेन अक्टीव्हेशनचे कितीही प्रशिक्षण दिले तरी अश्या प्रकारे वस्तू ओळखता येत नाही हे देखील पत्रकात नमूद केले आहे.
वैद्यकीयदृष्ट्या मिडब्रेन, वास घेणे अथवा स्पर्श या गोष्टींचा आणि दिसण्याची क्रिया यांचा संबंध नसल्याने जैविक पातळीवर मिड ब्रेन अक्टीव्हेशन मुळे वास घेवून अथवा स्पर्शाने डोळे बंद असताना दिसू शकते हा दावाच वैद्यकीय दृष्ट्या अशक्य असल्याची माहिती देखील पत्रकात देण्यात आली आहे .केवळ संगीताचा वापर करून प्रशिक्षणाचा वर्ग घेण्यास हरकत असण्याचे कारण नसून मिड ब्रेन अक्टीव्हेशनच्या नावाखाली चमत्काराचा दावा करून पालकांची आणि मुलांची फसवणूक करण्यास अंनिसचा विरोध आहे व ही एक आधुनिक प्रकारची बुवाबाजीचा आहे असे देखील ते म्हणाले .
काही वाहिन्यांवरून मिड ब्रेन अक्टीव्हेशनचे जे कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येत आहेत, त्याविषयी अंनिस तर्फे प्रसार भारती कडे तक्रार दाखल करण्यात आली आहे असे देखील त्यांनी सांगितले.
जादूटोणा विरोधी कायद्या अंतर्गत ह्या विषयी तक्रार दाखल करता येवू शकते का याचा देखील कायदेशीर सल्ला महा अंनिस घेत असल्याचे ह्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे
प्रसिद्धी पत्रक
Anis press note




