महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज: इथे पहा निवडणुकीचे थेट निकाल

मुंबई : राज्यातील निवडणूकांच्या निकालाचा अचूक मतमोजणी आढावा जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी निवडणुक आयोगाने देखील कंबर कसली असल्याने सोशल मीडिया, डीजीटल मीडियाचा विशेष प्रभाव यावेळी निवडणुकीमध्ये दिसून आला.. त्यामुळे तरीही महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या निकाल पाहण्यासाठी मा.भारत निवडणूक आयोगाने https://results.eci.gov.in/index1.html ही वेबसाईट तयार केली आहे. निकालाच्या दिवशी म्हणजेच शनिवार,दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून ही वेबसाईट कार्यान्वित होणार आहे.
या वेबसाईटवर निकालाचे ट्रेंड व निकालाची माहिती रियल टाईममध्ये मिळणार आहे. तरी अधिकृत निकालासाठी सर्वांनी या वेबसाईटचा उपयोग करावा अशी माहिती ठाणे जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने मतमोजणीसाठी तयारी पूर्ण केली आहे. तब्बल २८८ मतदार संघाचे निकाल हे निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपडेट केले जाणार आहे. त्यामुळे निकालाची अधिकृत आकडेवारी ही निवडणूक आयोगाच्या संकेत स्थळावर पाहता येणार आहे.
मतमोजणी केंद्रांच्या प्रस्तावास निवडणूक आयोगाने मंजुरी दिली आहे. सर्व जिल्हा निवडणूक अधिकारी/निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी बाबत प्रसिद्धी दिली आहे. निवडणूक लढविणारा उमेदवार, राजकीय पक्षांना मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणाबाबत लेखी स्वरूपात कळविण्यात आले आहे. निरीक्षक व उपस्थित उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समोर सीलबंद स्ट्राँग रूम्स उघडण्यात येतील व ईव्हीएम मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील. मतमोजणी केंद्रातील सर्व कार्यवाही सी.सी. टीव्हीद्वारे चित्रित केली जाईल. तीन- स्तरीय सुरक्षा व्यवस्था निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लागू करण्यात आली आहे.