महाराष्ट्र

प्रतिबंधानंतर पर्यटकांच्या सेवेसाठी एमटीडीसी होतेय सज्ज…

कर्मचाऱ्यांना आदरातिथ्य आणि कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे प्रशिक्षण

मुंबई, दि. २९ : सध्याच्या साथीच्या काळामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करुन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) पर्यटक निवासात साफसफाई, दुरुस्ती आणि निर्जंतुकीकरणाची कामे सुरु आहेत. त्याचबरोबर आता सध्याच्या प्रतिबंधात्मक कालावधीत एमटीडीसीमार्फत सर्व कर्मचाऱ्यांना विविध विषयांवर ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील यांच्या संकल्पनेतून आणि उपमहाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल यांच्या नियोजनानुसार ही प्रशिक्षणे आयोजित करण्यात आली आहेत. महामंडळाचे पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी ही माहिती दिली.

एमटीडीसी आणि पुणे येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षणे होत आहेत. या कौशल्य विकास प्रशिक्षणाअंतर्गत Front Office Management, House Keeping आणि Food and Beverages याबाबतचे आधुनिक प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षणाअंतर्गत Attitude based Training आणि Pandamic Based Training सह प्रात्यक्षिकही घेण्यात येत आहे.

पर्यटकांना आनंदी ठेवणे, उच्च दर्जाच्या सुविधा पुरविणे, स्वत:ची स्वच्छता आणि परिसराची साफसफाई, खोल्यांचे निर्जंतुकीकरण, पर्यटकांच्या आरोग्याची सर्वोच्च काळजी घेणे याचा समावेश प्रशिक्षणामध्ये करण्यात आला आहे. प्रशिक्षण दोन आठवड्याचे असून विषयातील तज्ञ प्रशिक्षकांमार्फत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. 500 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.

दरम्यान, सध्या पर्यटकांच्या सुरक्षेस सर्वोच्च प्राधान्य देत शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन महामंडळाच्या पर्यटक निवासात करण्यात येत आहे. उपहारगृह, रिसॉर्ट आणि अनुषंगिक बाबींची तसेच परिसराची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. पर्यटकांना तातडीच्या वैद्यकीय कारणांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पर्यटक निवासात पर्यटकांना आयुर्वेदी‍क काढा, व्हिटॅमिन सी आणि डी उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच शरीराचे तापमान मोजणारी यंत्रणा, सॅनिटाईज करणारे स्प्रे अशी व्यवस्थाही करण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांसाठी मुखपट्टी, फेसशिल्ड, हातमोजे इ. व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोनाविरोधातील लढाईचा एक भाग म्हणून कर्मचाऱ्यांना कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. महामंडळाच्या उपहारगृहामध्ये गर्दी टाळण्यासाठी पर्यटकांना त्यांच्या खोल्यांपर्यंत अल्पोपहार, जेवण आणि अन्य अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येत आहेत.

वर्क फ्रॉम नेचर’अंतर्गत सुविधा उपलब्ध

“वर्क फ्रॉम नेचर” संकल्पनेंतर्गत
एमटीडीसीने आता राज्यातील विविध रिसॉर्टवर वायफाय सुविधा दिली आहे. यात पर्यटन झोनवरील सुविधा मोफत आहेत, तर एखाद्या पर्यटकाने मागणी केल्यास त्याच्या निवासी कक्षातही अशी सुविधा देण्यात येत आहे. “वर्क फ्रॉम नेचर” बरोबरच योगा आणि मेडीटेशन अशी सुविधा पहिल्या टप्प्यात कोयनानगर, माथेरान, महाबळेश्वर येथे सुरु करण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात तारकर्ली, गणपतीपुळे, माळशेजघाट, पानशेत येथील रिसॉर्टवर ही सुविधा सुरु होईल.

अधिक माहीती महामंडळाच्या www.maharashtratourism.gov.in या वेबसाईटवर ऊपलब्ध 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!