१ एप्रिलपासून लागू होणार नवीन वीजदर, महावितरणने दिले स्पष्टीकरण !

मुंबई : राज्यात 1 एप्रिलपासून नवीन वीजदर लागू करण्याच्या महावितरणच्या याचिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. मात्र, महावितरणने स्पष्टीकरण देत, घरगुती वीज ग्राहकांना व्यावसायिक दर आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
महावितरणने स्पष्ट केले आहे की, जर तुम्ही घरी शिकवणीवर्ग, ब्यूटी पार्लर , वकील, सीए (CA) ऑफिस किंवा डॉक्टरांचे क्लिनिक उघडले, तर दरमहा 300 युनिट्सपर्यंतच घरगुती दराची सवलत दिली जाईल. 300 युनिट्सच्या वरील वापरासाठी व्यावसायिक दराने वीज आकारली जाईल. विविध आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, महावितरणने पुढे येऊन ग्राहकांसमोर आपले म्हणणे मांडले आहे. काही ग्राहक आणि इतर संस्था वीज ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप महावितरणने केला आहे. आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांवरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे, महावितरणने म्हटले आहे.
सोलर बसवणाऱ्या ग्राहकांना आता लाभ मिळत नसल्याच्या आरोपावर महावितरणने सांगितले की, नेट मीटरिंगमध्ये कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे, या ग्राहकांना कोणताही धक्का लागणार नाही. पुढील पाच वर्षांसाठी टप्प्याटप्याने वीजदर कमी करण्याचा प्रस्ताव असल्याचेही, महावितरणचा दावा आहे.