खळबळजनक! सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्याकडे सापडली १२५ कोटींची मालमत्ता

हरियाणा- सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) अधिकाऱ्याकडे सापडलेल्या संपत्तीमुळे खळबळ माजली आहे. हरियाणामधील या अधिकाऱ्याकडे तब्बल १४ कोटींची रोख रक्कम, दागिने आणि सात महागड्या सापडल्या आहेत. या गाड्यांमध्ये बीएमडब्ल्यू, जीप आणि मर्सिडीज यांचा समावेश आहे.
बीएसएफमध्ये डेप्युटी कमांडंट असणारे प्रवीण यादव गुरुग्राम येथील मानेसरमधील राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयात कार्यरत होते. आयपीएस अधिकारी असल्याचं भासवत लोकांची फसवणूक करत १२५ कोटींची मालमत्ता त्यांनी जमा केली होती. पोलिसांनी या अधिकाऱ्याला अटक केली आहे.
गुरुग्राम पोलिसांनी अधिकाऱ्यासोबत त्यांची पत्नी ममता यादव, बहिण रितू आणि सहकाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत. आयपीएस अधिकारी असल्याचं सांगत प्रवीण यादव यांनी लोकांना राष्ट्रीय सुरक्षा रक्षक मुख्यालयाच्या परिसरात बांधकामाचं कंत्राट मिळवून देण्याचं आश्वासन देत कोट्यावधी रुपये घेतले असल्याचे यातून समोर आले आहे.