उत्तर प्रदेशात काँग्रेसला झटका! माजी केंद्रीय मंत्री जितीन प्रसाद भाजपामध्ये दाखल

उत्तर प्रदेश : पुढील वर्षी २०२२ मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकांच्या आधीच काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. युपीए-२ च्या काळात केंद्रात मंत्रीपदी राहिलेले उत्तर प्रदेशमधील वरीष्ठ नेते जितिन प्रसाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमधील भाजपाच्या मुख्यालयात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत जितिन प्रसाद यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
उत्तर प्रदेश काँग्रेसमधील एक महत्त्वाचा चेहरा आणि प्रमुख नेताच भाजपानं गळाला लावल्यामुळे आता काँग्रेससमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, २०१९मध्ये पक्षाच्या कार्यपद्धतीमध्ये अमूलाग्र बदलाची मागणी करणाऱ्या जी-२३ गटापैकी जितिन प्रसाद एक आहेत!
भाजपाचे उत्तराखंडमधील खासदार अनिल बलूनी यांनी आज सकाळीच जितिन प्रसाद भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचं ट्वीट केलं होतं. जितिन प्रसाद यांच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेससाठी आगामी उत्तर प्रदेश निवडणुकांचा पेपर कठीण झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. जितिन प्रसाद हे उत्तर प्रदेशमधील एक प्रभावी नेते आहेत. विशेषत: काँग्रेससाठी ते उत्तर प्रदेशमधील ब्राह्मण चेहरा असल्यामुळे आता उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसचं व्होटबँकेचं गणित बिघडण्याची शक्यता आहे.