मनोरंजनसाहित्यिक

बोराडे सरांच्या जाण्यानं ग्रामीण साहित्याची नाळ तुटली

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : शहरीकरणाच्या झपाट्यात शहरी संस्कृतीत रमलेल्यांना आपलं मूळ असलेल्या खेड्यापाड्यांमधल्या संस्कृतीची आठवण करून देणारा अग्रगण्य साहित्यकार आज आपल्यातून हरपला आहे. बोराडे सरांच्या जाण्याने साहित्यातली शहरी आणि ग्रामीण भागाची नाळच जणू तुटली आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, नुकताच रा.रं.बोराडे यांना मराठी साहित्यातील भरीव कामगिरी केल्याबद्दल भाषा विभागातर्फे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता. हा पुरस्कार त्यांना एका दिमाखदार सोहळ्यात देण्याचं आयोजन करण्यात आलं होतं, मात्र दुर्दैवानं त्याआधीच ते आपल्याला सोडून गेले. केवळ साहित्यिकांनाच नव्हे तर त्यांना ओळखणारे सर्वसामान्य लोक, त्यांचे चाहते असलेल्या विद्यार्थ्यांना देखील बोराडे सरांच्या जाण्यानं निश्चितपणे आज धक्का बसला आहे.

एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेले बोराडे सर म्हणजे महाराष्ट्रातल्या ग्रामीण संस्कृतीची एक साहित्यिक ओळख होती. त्यांच्या साहित्यातील ग्रामीण भागातली बदलती स्थित्यंतर आणि वास्तव चित्रण हे नेहमीच हृदयाला भिडणारे असायचे. अतिशय साधेपणानं राहणाऱ्या बोराडे सरांनी कथाकार-कादंबरीकार, बालसाहित्य लेखक, म्हणून मोठी ओळख मिळवली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष म्हणून जबाबदारीचे कामही त्यांनी पार पाडले होते.

‘पाचोळा’, ‘आमदार सौभाग्यवती’ ‘चारापाणी’ अशा अनेक कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आहेत. कणसं आणि कडबा, पेरणी, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा या कथासंग्रहासह ‘शिका तुम्ही हो शिका’ ही बालकादंबरी, रहाट पाळणा आदी साहित्य बोराडे यांच्या लेखणीतून उतरले.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य ते अध्यक्ष, ग्रामीण साहित्य परिषदेचे अध्यक्ष, १९८९ साली हिंगोली येथे भरलेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद आदी अनेक पदे त्यांनी भूषवली होती. बोराडे सरांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाने दर्जेदार ज्येष्ठ साहित्यिक गमावला आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!