महाराष्ट्रमुंबईराजकीय

महाराष्ट्रातील अतिवृष्टिग्रस्तांसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षाचे सर्व मंत्री खासदार आणि आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस

मुंबई : महाराष्ट्रातील मराठवाड्यात आणि अनेक भागांमध्ये आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी पुढाकार घेतला आहे. भारतीय जनता पार्टी (भाजपा), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपापल्या मंत्र्यांचे तसेच खासदार आणि आमदारांचे एक महिन्याचे वेतन पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुती मधील तिन्हीपक्षांतर्फे सर्व मंत्री, आमदार, खासदार यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचा निर्णय घेतला असून याबाबतीत तिन्ही पक्षांनी आपापल्या पक्षांमार्फत ही घोषणा केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस -उपमुख्यमंत्री अजितदादा पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार सर्व मंत्री, खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य यांनी तातडीने एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचे ठरवले आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मानवी जीव, घरे, जनावरे, शेतजमिनी व खरीप-बागायती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. ही परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी आहे. या कठीण काळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निर्देशानुसार सर्व मंत्री, खासदार, आमदार, विधानपरिषद सदस्य यांनी तातडीने एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्याचे ठरवले आहे. हीच खरी जनसेवा आहे. या कठीण काळात एकत्र उभं राहून महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त बांधवांना नवजीवन देण्याचा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे.

शिवसेनेच्या मंत्री, आमदारांचे एक महिन्याचे वेतन अतिवृष्टीग्रस्तांसाठी – उपमुख्यमंत्री शिंदे
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना शिवसेनेने मोठा मदतीचा हात दिला आहे. शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचे तसेच आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री निधीस देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला आहे. नैसर्गिक आपत्तीत शिवसेना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांना मदत करण्यात कधीही हात आखडता घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

भाजपा खासदार व आमदार एकजुटीने पुढे सरसावले
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पूरस्थिती ओढावल्यामुळे संकटात सापडलेल्या पूरग्रस्तांच्या पाठीशी भाजपा-महायुती सरकार आणि भारतीय जनता पार्टी खंबीरपणे उभे आहे. शासनाच्या वतीने पूरग्रस्तांचे मदत व पुनर्वसन कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. भाजपा कार्यकर्ते देखील प्रशासनाला सहकार्य करत आहेत. या कामाला आणखी गती देण्याच्या उद्देशाने राज्यातील सर्व भाजपा खासदार व आमदार एकजुटीने पुढे सरसावले आहेत. यासाठी खासदार व आमदारांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे. यामुळे पूरग्रस्तांना दिलासा मिळेल, अशी आशा !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!