महाराष्ट्रमुंबई

‘आरे’चा मास्टर प्लॅन तयार; ‘आरे’चा होणार कायापालट

दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी केली पाहणी

मुंबई : गोरेगाव परिसरातील आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांगिण विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून येत्या काही दिवसांत ‘आरे’चा कायापालट झाल्याचे दिसून येईल, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास व अपारंपरिक उर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.

मंत्री सावे यांनी आज आरे दुग्ध वसाहत परिसराची पाहणी करून विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी स्थानिक आमदार मुरजी पटेल, आमदार बाळा नर, आरेचे सीईओ श्रीकांत शिपूरकर आदी उपस्थित होते.


आरेची दुग्धवसाहतीकडे सध्या ११६2 एकर जमीन शिल्लक असून यात दुग्धवसाहत, गोशाळा, तबेले, बगीचा, लॉन, पॅराग्रास व वृक्षारोपण करण्यात आले आहे.

आरे परिसरातील नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणी तसेच परिसरातील रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना मंत्री सावे यांनी यावेळी केल्या.

 

यावेळी आरेच्या सर्वांगिण विकासासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीने मास्टर प्लॅनचे सादरिकरण केले. मास्टर प्लॅननुसार आरे दुग्धवसाहतीचा आठ टप्प्यात विकास करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामध्ये दुर्मिळ प्राणी, वन्यजीव व वनस्पतींचा शोध घेणे, अत्याधुनिक गोशाळा उभारणे, बोटींग, बगिचा, कलादालन आदी उभारण्यात येत आहे. हे करत असताना पर्यावरण संवर्धनास प्राधान्य दिले जाईल असे सावे म्हणाले.

या भागात पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध बदल करण्याच्या सूचना श्री. सावे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या.

आढावा बैठकीनंतर मंत्री सावे यांनी आरे नर्सरी गट क्र. २०, गणेश तलाव, रवींद्र आर्ट गॅलरी, आरे रुग्णालय, न्यूझीलंड हॉस्टेल, छोटा काश्मीर उद्यान, गट क्रमांक २ येथील परिसर या भागांना भेट देऊन पाहणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!