आठवणीतील गंगाराम गवाणकर

थोर नाटककार, मिश्किल स्वभावाचे,आपल्या नाट्य क्षेत्रातील कामगिरीचा, महात्म्याच्या अजिबात गर्व न बाळगणारे ,जेष्ठ स्नेही गंगाराम गवाणकर यांचे नुकतेच निधन झाले आणि इतरांना सतत हसवत ठेवणाऱ्या गंगाराम गवाणकर यांनी पहिल्यांदाच दुसऱ्यांच्या डोळ्यात आसू आणले.
१ जून १९३९ रोजी जमलेल्या गंगाराम गवाणकर यांचे प्राथमिक शिक्षण कोकणातील माडबन गावात झाले .पुढे त्यांनी मुंबई गाठली. मुंबईत त्यांना सुरुवातीस चक्क स्मशानात रहावे लागले होते. असे ते भयानक दिवस,त्या नंतरचा संघर्ष त्यांनी त्यांच्या “व्हाया वस्त्रहरण ” या आत्म चरित्रात अत्यंत चित्रमय शैलीत रेखाटला आहे. त्यांचे हे आत्म चरित्र त्यांनी मला भेट दिले होते.ते वाचून संपल्यावर, आजतागायत मला याचे नेहमी आश्चर्य वाटत आले आहे की , इतक्या हाल अपेष्टेचे बालपण आणि तारुण्य वाट्याला येऊनही ते स्वतः आयुष्यभर हसऱ्या चेहऱ्याने कसे जगू शकत होते ? इतकेच नाही तर इतरांच्या चेहऱ्यावर हसू आणणारी नाटके कसे लिहू शकले ? त्यांच्या प्रत्यक्ष सहवास हा सुद्धा नेहमीच आनंददायी असा असे.
खरं म्हणजे,माझा आणि त्यांचा परिचय हा त्यांच्या नाटकामुळे नाही तर,त्यांच्या नोकरीमुळे झाला. बऱ्याच जणांना हे माहिती नसेल की ते मुंबई टेलिफोन्स मध्ये नोकरीला होते.(नंतर याच मुंबई टेलिफोन्स चे रूपांतर मुंबई महानगर टेलिफोन निगम अर्थात एमटीएनएल मध्ये झाले.) पण त्यांचा जनसंपर्क लक्षात घेऊन एमटीएनएल ची प्रसिद्धी विषयक अनेक कामे ते खुशीने करीत असत. तेव्हा मी मुंबई दूरदर्शन केंद्रात सहायक निर्माता म्हणून काम करीत होतो. तिथेच आमची पहिली भेट झाली.
त्यावेळचे एमटीएनएल चे महाप्रबंधक श्री सी व्ही परांजपे यांची मुलाखत दूरदर्शनवर व्हावी , यासाठी गंगाराम गवाणकर प्रयत्नशील होते.पण दूरदर्शनच्या कार्यक्रमांचे स्वरूप पाहता ते काही शक्य होत नव्हते. दरम्यान गणित आणि विज्ञान या विषयांशी वाकडे असलेल्या माझ्याकडे नेमक्या “विज्ञान जगत” या कार्यक्रमाच्या निर्मितीची जबाबदारी सोपविण्यात आली. त्याकाळी लँड लाइन फोनला पर्याय नव्हता. आणि रॉग कॉल लागणे ही एक मोठीच डोकेदुखी होती. काही लोक त्यावेळी गमतीने, उपहासाने एमटीएनएल चा लाँग फॉर्म “मेरा टेलिफोन नहीं लगता” असे करीत असत.
या सर्व पार्श्वभूमीवर मी “विज्ञान जगत” या कार्यक्रमात टेलिफोन कसे लागतात, त्यासाठी काय यंत्रणा असते, तिचे कामकाज कसे चालते आणि महत्वाचे म्हणजे रॉग नंबर का लागतात आणि ते तसे लागू नये या विषयावर कार्यक्रम करायचे ठरविले.मग त्यासाठी टेलिफोनच्या सर्व यंत्रणेचे चित्रीकरण प्रभादेवी येथील दूरध्वनी केंद्रात करण्यात आले. तसेच परांजपे साहेबांची मुलाखतही घेतली. मला आठवते, त्याप्रमाणे लेखक श्री अशोक बेंडखळे यांचा आणि माझा परिचय त्याच दरम्यान झाला.
केलेला कार्यक्रम हा लोकांच्या दृष्टिकोनातून केलेला असला,तरी गंगाराम गवाणकर यांचे कार्यालयातील वजन त्यामुळे नक्कीच वाढले असणार.पण त्यांचा मोठेपणा असा की याची जाणीव त्यांनी सदैव ठेवली.त्यांचे माझ्याशी नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध कायम ठेवले.पुढे दूरदर्शन सोडून मी महाराष्ट्र शासनाच्या माहिती खात्यात नोकरीस लागलो. त्या भागात किंवा खुद्द मंत्रालयात जरी ते काही कामाने आले तरी मला भेटल्याशिवाय जात नसत. एकदा मला त्यांच्यावर लेख लिहायचा होता. त्यासाठी त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचे
छायाचित्र हवे होते. त्यावेळी ते अत्यंत निरलसपणे म्हणाले, अहो ,इतक्या ट्रॉफीस मिळाल्या आहेत की,त्या ठेवायला घरात जागा नाही. म्हणून शेवटी गोणीत भरून त्या गावच्या घरात नेऊन ठेवल्या आहेत! आठ नऊ वर्षांपूर्वी मंत्रालयात झालेली ती आमची शेवटची भेट ठरली. त्यानंतर मात्र कधी त्यांना भेटण्याचा योग आला नाही.आणि काही व्यक्ती अशा असतात की त्या आपल्या मनात सतत वास्तव्य करून असतात. त्यामुळे त्यांना भेटलेच पाहिजे,अशी कधी गरजही वाटत नाही,असे ते होते.
गंगाराम गवाणकर यांच्या नाट्य प्रवासाविषयी सांगायचे तर प्रेक्षकांना सतत हसवत ठेवणारे,निखळ मनोरंजन करणारे ‘वस्त्रहरण’ नाटक लिहून १९८० साली लिहून त्यांनी जगभरच्या मराठी जनात मालवणी बोली लोकप्रिय केली.या नाटकाचे तब्बल ५ हजार ४०० असे विक्रमी प्रयोग झाले. “वस्त्रहरण”शिवाय त्यांनी वन रूम किचन, दोघी, वर परिक्षा ,वर भेटू नका, उष:काल होता होता ,वात्रट मेले,पोलिस तपास चालू आहे, अरे बाप रे, महानायक, वडाची साल पिंपळाक, भोळा डांबिस, मेलो डोळो मारून गेलो,अशी लोकप्रिय नाटके, कादंबरी ,चरित्र मिळून २० पुस्तके लिहिली. या शिवाय आकाशवाणी, दूरदर्शन साठीही त्यांनी सातत्याने लेखन केले होते.९६ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.१९९८ साली प्रदर्शित झालेल्या जागर या चित्रपटाचे संवाद लेखन त्यांनी केले होते. पण ते चित्रपट सृष्टीत कधी रमले नाहीत.
गंगाराम गवाणकर यांना मिळालेल्या अनेक पुरस्कारांपैकी दोन महत्वाचे पुरस्कार म्हणजे झी वाहिनीतर्फे देण्यात आलेला जीवन गौरव पुरस्कार आणि २०२३ साली मालिका, नाटक,चित्रपट लेखक संघटनेचा “मानाचि ” पुरस्कार हे होत. गेले काही काळ आजाराशी झुंज देत असलेल्या गंगाराम गवाणकर यांच्या दोन्ही मुलांनी आणि दोन्ही सुनांनी शेवटपर्यंत त्यांची मनापासून सेवा केली,याचा इथे आवर्जून उल्लेख केला पाहिजे. तमाम नाट्य रसिक, गंगाराम गवाणकर यांचे चाहते,मित्रमंडळी यांच्यावतीने या चौघांचेही मनःपूर्वक आभार. गंगाराम गवाणकर यांना विनम्र अभिवादन.
लेखन:देवेंद्र भुजबळ
माजी दूरदर्शन निर्माता तथा निवृत्त माहिती संचालक
नवी मुंबई.
☎️9869484800.





