मनोरंजन

मिलिंद शिंदे थरारक ‘घात’ चित्रपटात नक्षलवाद्याच्या भूमिकेत

मुंबई – महोत्सवांत दाखवलेला चित्रपट म्हणजे काहीतरी कलात्मक हा समज खोटा ठरवत एक दमदार, थरारक कथानक “घात” या चित्रपटातून उलगडणार आहे. छत्रपाल निनावे दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेते मिलिंद शिंदे नक्षलवाद्याच्या, तर जितेंद्र जोशी पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहेत. २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे.

प्लॅटून फिल्म्स, दृश्यम फिल्म्स यांनी लाइटहाऊस इनोव्हेंचर्स, पायतमाशा, यूए कथाचित्र यांच्या सहकार्याने घात चित्रपटाची निर्मिती केली आहे. शिलादित्य बोरा, मनीष मुंद्रा, मिलापसिंह जडेजा, संयुक्ता गुप्ता, कुणाल कुमार चित्रपटाचे निर्माते आहेत. अशोक महापात्रा, शिल्पी अगरवाल, प्रणव चतुर्वेदी सहनिर्माता आहेत. छत्रपाल निनावे यांनी चित्रपटाचं लेखन दिग्दर्शन, विकास मुडकी यांनी संवाद लेखन, उदय खुराणा यांनी छायांकन, नवनीता सेन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. बर्लिन महोत्सवासारख्या अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये हा चित्रपट पुरस्कारांचा मानकरी ठरला आहे.

मध्य भारतातील माओवादग्रस्त जंगलांच्या सीमेवर, गनिम, नागरिक आणि पोलिस यांच्यात तणावपूर्ण संवाद सुरू आहे. परस्परविरोधी विचारसरणींमध्ये अडकून ते स्वतःबद्दल आणि व्यवस्थेबद्दल अनेक सत्ये उघड करतात. जंगलाच्या मध्यभागी, जीवन, हिंसाचार आणि मृत्यूच्या सतत जवळ असलेल्या गुन्हेगार आणि पीडितांचे काय होते. मध्य भारतात ५० वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या गृहयुद्धाचे एक अतुलनीय मनोवैज्ञानिक चित्र घात या चित्रपटात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमधून एक नक्षलवादी, पोलिस अधिकारी यांच्यातील थरारक संघर्ष दिसतो. त्यामुळे एक गुंतागुंत असलेलं मनोरंजक कथानक घात या चित्रपटातून २७ सप्टेंबरपासून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!