मुंबईत ‘क्लास वन’ अधिकाऱ्याच्या घरात सापडले कोटयवधीचे घबाड,पैसे मोजता मोजता पोलीस चक्रावले

मुंबई- काही दिवसांपूर्वी कानपुर येथे एका अत्तर व्यापाऱ्याच्या घरी सापडलेल्या कोट्यवधी रुपयाचे प्रकरण ताजे असताना आता असाच काहीसा प्रकार मुंबईत सुद्धा घडला आहे. वांद्रे येथील शिक्षण व प्रादेशिक विभागाचे सह संचालक अनिल मदन जाधव यांच्या घरात कोटयवधीचे घबाड मिळून आले आहे. त्यांच्या घर, कार्यालयातून १ कोटी ६१ लाख ३८ हजार किंमतीच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
तक्रारदार हे टेंडर स्किन इंंटरनॅशनल कॉस्मेटोलॉजी अँँकॅडमीमध्ये भागीदार असून त्यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळ येथे त्यांच्या अँँकॅडमी व त्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या कोर्सच्या मंजुरी करता जाधव यांच्या कार्यालयात अर्ज केला होता. त्यासंदर्भातील सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असून २०२१ मध्ये त्यांना पूर्व मंजुरी प्राप्त झाली होती.
मात्र अंतिम मंजुरी करता जाधव याने पाच लाखांची मागणी केली.यादरम्यान मंगळवारी पाच लाखांची रक्कम स्वीकारताना अनिल मदन जाधव याला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून एसीबी अधिक तपास करत आहेत. एसीबीने त्यांच्या घर, कार्यालयात सर्च ऑपरेशन केले आहे.
यामध्ये घरात एक किलो ५७२ ग्रँम सोने, आणि ७९ लाख ४६ हजार रूपयांची रोकड मिळून आली आहे. तर कार्यालयातून २ लाख २८ हजार रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दागिने, आणि रोकड जप्त करत अधिक तपास करत असल्याचे एसीबीने सांगितले आहे. तसेच त्यांच्या अन्य मालमत्तेबाबतही अधिक चौकशी सुरु आहे.