राज्यातील शाळा उघडण्यावर गुरुवारी निर्णय, मंत्री बच्चू कडू यांची माहिती

मुंबई:- वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातील शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. दरम्यान या निर्णयाला शाळा व्यवस्थापनाकडून आणि काही संस्थांकडून विरोध झाला. त्यातच मागील दोन दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा आहे घटू लागला आहे. याच धर्तीवर शाळा पुन्हा सुरू व्हाव्यात अशी मागणी शिक्षक, शाळा संस्था चालक आणि पालक करू लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधताना, शाळा उघडण्याबाबत गुरुवारी निर्णय घेऊ असं म्हटलं आहे.तसंच येत्या गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत राज्य कोरोना कृती दलाची बैठकही होणार आहे. या बैठकीत शाळांबाबत आम्ही सविस्तर निर्णय घेऊ, असं मत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे.
दरम्यान नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. आता या निर्णयावर गुरुवारी फेरविचार करण्यात येणार आहे. त्यामुळे आता यातून पुढे काय निर्णय राज्य सरकार घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.