बदनामीप्रकरणात मंत्री नवाब मलिकांची न्यायालयात हजेरी; १५ हजारांच्या जातमुचलक्यावर दुसऱ्यांदा जामीन मंजूर
मुंबई- मंत्री नवाब मलिक यांना भाजपा नेते मोहित भारतीय यांच्या बदनामीच्या तक्रारीत माझगाव येथील दंडाधिकारी न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. मलिक यांना न्यायालयात हजर राहून जामीन मागण्याची ही दुसरी वेळ आहे. भारतीय यांनी त्यांच्या तक्रारीत असा आरोप केलाय, की मलिक यांनी त्यांच्या कथित दाव्यांना खरे सिद्ध करण्यासाठी कोणत्याही पुराव्याशिवाय युक्तिवाद करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची बदनामी करण्यासाठी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केला आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये मलिक कोर्टात हजर झाले होते.
मलिक यांच्यावर असा आरोप होता की, नोव्हेंबरमध्ये जेव्हा त्यांनी कोर्टात जामीन मागितला होता, त्यावेळी कोर्टातून बाहेर पडताच त्यांनी भारतीय यांच्यावर पुन्हा भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. दरम्यान, माझगाव, मुंबई येथील महानगर दंडाधिकारी, पीआय मोकाशी यांनी १४ डिसेंबर २०२१ रोजी मलिक यांना नोटीस बजावली होती. मलिक यांच्याकडून सार्वजनिक स्तरावर भारतीयांविरुद्ध बदनामीकारक विधाने केली गेली आहेत, असं त्यात म्हटलं होतं. मोहित भारतीय यांच्यातर्फे वकील फैज मर्चंट यांनी न्यायालयाला सांगितले की, मलिकांना जामीन मिळाल्यानंतरही नोव्हेंबरमध्ये त्यांनी मोहित भारतीय यांची बदनामी केली होती.
बुधवारी मलिक न्यायालयात हजर झाल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. न्यायाधीश मोकाशी यांनी १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला. मोहित भारतीय यांची मलिकांविरोधात बदनामीची ही दुसरी तक्रार आहे, याची दखल घेऊन भविष्यात अशा प्रकारची वक्तव्ये करू नयेत, असे निर्देशही कोर्टाने मलिक यांना दिले.