ब्रेकिंग

मुंबई-पुणे महामार्गावर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

दौलतनगर:- राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे तत्पर व धाडसी तसेच तातडीने मदतीला धावून जाणारे मंत्री म्हणून ओळखले जातात. मग तो प्रसंग कोणताही असो, अडचणीच्या काळी शंभूराज देसाई हे मदतीला नेहमी धावून जातात याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. असाच अपघाताचा प्रसंग काल मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे घडला.या महामार्गावरुन साताऱ्याकडे येणारे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई अपघात झाल्याचे पहाताच आपल्या वाहनांचा ताफा थांबवत ते तत्परतेने अपघातग्रस्तांच्या मदतीला धावत गेले.

काल सकाळी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा ताफा मुंबईवरुन साताऱ्याच्या दिशेने येत असताना मुंबई-पुणे महामार्गावर खोपोली येथे अपघात झाला असल्याचे शंभूराज देसाईंच्या निदर्शनास आल्यानंतर तात्काळ त्यांनी आपल्या गाडयांचा ताफा बाजूला केला.

धावत त्या अपघातस्थळी जात त्यांनी अपघात झालेल्या कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी केली.अपघातामध्ये कुणाला गंभीर दुखापत वगैरे झाली आहे का? याची खात्री करुन त्यांनी तातडीने स्वत: हायवे पोलीस विभागातील संबंधित अधिकारी यांना फोन केला आणि तात्काळ अपघातस्थळी पोहचून अपघातग्रस्त कुटुंबियांना तातडीने आवश्यक ती मदत करण्याच्या सूचना केल्या.

तसेच अपघात झालेले वाहन हे संबधित यंत्रणेमार्फत मुंबईकडे नेण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई ते सातारा असा प्रवास करताना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या सतर्कतेमुळे खोपोली येथील महामार्गावर अपघात झालेल्या कुटुंबियांना तात्काळ आवश्यक ती मदत झाल्याने अपघातग्रस्त कुटुंबियांनी शंभूराज देसाई यांचे आभार मानले.यावेळी अपघातग्रस्त कुटुबियांना काळजी घ्या असेही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यावेळी म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!