कोंकणवैद्यकीय

व्हॅक्सीन ऑन व्हील्सचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण..

कोविड लसीकरणासाठी रुग्णवाहिका सज्ज

रत्नागिरी: रत्नागिरी तालुका व शहरातील नागरिकांना कोविड प्रतिबंधात्मक लस देण्याकरीता व्हॅक्सीन ऑन व्हील्स जिविका हेल्थकेअर प्रा.लि. तर्फे एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण काल उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.

व्हॅक्सीन ऑन व्हील्स जिविका हेल्थकेअर प्रा.लि. या संस्थेने आयआयटी हैद्राबाद आणि बिल अँड मिलिंडा गेटस फाऊंडेशन या संस्थांबरोबर 2019 मध्ये भारतातील पहिले डॉक्‍टर आधारित मोबाईल लसीकरण क्लिनिक सुरु केले आहे.  सर्वांसाठी दर्जेदार लसीकरणाचा प्रवेश सुनिश्चित करुन भारतातील अल्पसंख्याक व दुर्गम वाडीवस्तींमधील लोकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे यासाठी रुग्णालयासारखीच निर्जंतुकीकरण करुन मोबाईल लसीकरण रुग्णवाहिका देण्यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे.
दुर्गम तसेच मुख्य गावापासून दूर अंतरावर असणाऱ्या वाड्या वस्त्यातील नागरिकांना लस घेण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामेारे जावे लागत आहे.  या नागरिकांची अडचण ओळखून लस वाहतूक, साठवणूक तसेच दुर्गम भागात ने-आण करता येईल अशा रुग्णवाहिका तैनात करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाने सुरु केला होता.  या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा प्रशासनाला व्हॅक्सीन ऑन व्हील्स जिविका हेल्थकेअर प्रा.लि. तर्फे एका रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येत आहे.  या रुग्णवाहिकेमध्ये वैद्यकीय अधिकारी, लस टोचक व डेटा एन्ट्री ऑपरेटर हा स्टाफ कार्यरत असणार आहे.
जिल्ह्यामध्ये कोविड रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत असले तरी कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव कमी करण्यासाठी कोविड लसीकरण हे फार महत्वाचे आहे.   कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावावर कोविड लसीकरणाने मोठ्या प्रमाणात विजय मिळवून आजारावर प्रतिबंध करता येणे शक्य आहे.  यासाठी जिल्ह्यातील नागरिकांचे जास्तीत जास्त लसीकरण करणे आवश्यक आहे.  या रुग्णवाहिकेमुळे रत्नागिरी तालुक्यातील व शहरातील दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांमधील नागरिकांचे कोविड लसीकरणाला गती देण्यासाठी तसेच त्यांचे वेळेवर लसीकरण करण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!