कोंकणमहाराष्ट्र

कोकणी माणसाला आपत्ती आणि संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून सर्व नदी, नाले खोलीकरणासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद,मंत्री विजय वडेट्टीवारांची घोषणा

मुंबई- कोकणातील जनतेला दरवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.त्यामुळे या भागात आपत्ती निवारणासाठी कायमस्वरुपी योजना राबविण्यावर भर देणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे. महाड आणि कोकणातील आपत्तीसंदर्भात विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ते बोलत होते. कोकणात नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यात येते आहे,असं यावेळी ते म्हणाले.

त्याचप्रमाणे शाळा,समाजमंदिर,स्मशानभूमी,पिण्याचे पाणी यांसारख्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसान दुरुस्तीसाठी ३५ कोटी रुपये देण्यात येत आहेत,अशी माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली.एका महिन्यात हा निधी संबंधित विभागाकडे दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले.कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून कोकणी माणसाला आपत्ती आणि संकटाला सामोरे जावे लागू नये म्हणून सर्व नदी, नाले यांचे खोलीकरण करण्यात येईल.

यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूदही केली असल्याचे त्यांनी सांगितले. हे कार्य जलसंपदा विभागामार्फत तसेच खारजमीन विकासाच्या माध्यमातून राबविले जाईल, असे त्यांनी सांगितले. शाळेचे नुकसान, आरोग्य केंद्र, विद्युत जोडणी यांसारख्या सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीसंदर्भात मदत केली जाईल, असेही ते म्हणाले.या विषयाच्या अनुषंगाने उपस्थित झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अनिकेत तटकरे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, बाळाराम पाटील, ॲड. निरंजन डावखरे, भाई गिरकर, कपिल पाटील, आदींनी सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!