
मुंबई (महेश पावसकर)आरेमध्ये २७ आदिवासी पाडे व बिगर आदिवासी वसाहती पण आहेत. या सर्वांकडे जाणाऱ्या आरेमध्ये ४७ कि.मीच्या अंतर्गत रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था असून यामुळे येथील रहीविश्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे आरेतील मुख्य रस्ता मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सिमेंट काॅक्रीटीकरण करण्यात यात आहे. त्याच प्रमाणे आरेतील अंतर्गत रस्ते सिमेंट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे वित्त विभागात पाठविण्यात आलेल्या रूपये १७३ कोटी रूपयांचा प्रस्ताव मंजुर करून येत्या अर्थ संकल्पात यासाठी भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी जोगेश्वरी विधानसभेचे आमदार रविंद्र वायकर यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना विधानसभेत केली.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही या प्रश्नी प्रश्न उपस्थित करून आमदार वायकर यांनी निधीची मागणी केली होती. विद्यमान उपनगर जिल्हा पालकमंत्री यांनी आरेतील अंतर्गत रस्त्याच्या दुरूस्तीसाठी निधी देण्याचे मान्य केले. परंतु अद्याप निधी मिळालेला नाही. आरेतील अंतर्गत रस्त्याची दुरूस्तीसाठी निधी देणे शासनास शक्य नसेल तर अंतर्गत ४७ कि.मी रस्ते मुंबई महानगरपालिकेकडे देखभाल व दुरूस्तीसाठी हस्तांतरीत करावेत, अशी सुचनाही वायकर यांनी यावेळी केली. वित्त विभागाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने अंतर्गत रस्ते सुस्थितीत करण्यासाठी जो ४७ कोटी रूपयांचा डांबरी करणाचा प्रस्ताव पाठवला आहे. त्याला वित्त विभागाने मंजुरी द्यावी व या निधीतून डांबरीकरण ऐवजी येथील काही रस्ते प्राधान्याने सिमेंट काॅक्रीटीकरण करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही वायकर यांनी विधानसभेत केली.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रा अंतर्गत येणार्या आरे, मेघवाडी व जोगेश्वरी पोलिस ठाण्याची अवस्था अत्यंत दयनिय आहे. त्यामुळे आरे पोलिस स्टेशन नव्याने बांधण्यासाठी पशु व दुग्ध विभागाने मंजुर केलेली ५ एकर जागा विभागाने तात्काळ गृह विभागाकडे वर्ग करावी. त्याचप्रमाणे मेघवाडी पोलिस स्टेशनसाठी पश्चिम महामार्गावर रामगड येथे नविन पोलिस स्टेशन बांधण्यासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. जोगेश्वरी पोलिस स्टेशन हे भाड्याच्या जागेत आहे. हे पोलिस स्टेशन फार जुने आहे. पावसाळ्यात या ठिकाणी गुडघाभर पाणी साचते. त्यामुळे हे पोलिस स्टशनही नव्याने बांधण्याची गरज आहे. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात या तिन्ही पोलिस स्टेशनच्या उभारणीसाठी भरीव तरतूद करण्यात यावी, अशी मागणी वायकर यांनी यावेळी केली. विधानसभेत एस.आर.पी बल गट असून पोलिस भरतीच्या वेळी याठिकाणी महाराष्ट्राच्या विविध काना कोपऱ्यातून विद्यार्थी भरतीसाठी येतात. परंतू त्यांची रहाण्याची व्यवस्था नसल्याने भरतीवेळी त्यांना रस्त्यावर रात्र काढावी लागते. अशा विद्यार्थ्यांसाठी एस.आर.पीच्या कॅम्पसमध्ये जागा उपलब्ध करून दिल्यास आमदार निधीतून अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था करणे शक्य होईल.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात म्हाडाने बांधलेल्या पोलिस वसाहती असून याची अवस्था अत्यंत दयनीय झाल्या आहेत. अनेक घरांमध्ये स्लॅब पडून घडले अशा दुर्घटनेत रहीवाशी जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे म्हाडाच्या माध्यमातून येथील सर्व इमारतींचा पुनर्विकास करणे अत्यंत गरजेचे आहे. पुनर्विकास करताना ४ चा एफ.एस.आय मिळाल्यास १ एफ.एस.यामध्ये बांधकामाचा खर्च निघेल. पुढील एफ.एस.आय. मध्ये पोलिस सेवेत ज्यांनी २५ वर्ष पूर्ण केली आहे. त्यांच्याकडून बांधकामाचा खर्च घेऊन घरे देण्यात यावी. तसेच उरलेल्या २ एफ.एस.यामध्ये नविन घरे बांधून नव्याने भरती होणाऱ्या पोलिसांसाठी राखीव ठेवावी. यासाठी येत्या अर्थ संकल्पात निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आमदार वायकर यांनी पुरवणी मागण्यांवर बोलताना केली.