गोरेगाव मिररमुंबई

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चमूचा आ. सुनिल प्रभूंनी केला सत्कार!

मुंबई:६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या “राधा: द इटरनल मेलडी” या शॉर्ट ॲनिमेशन चित्रपटाच्या निर्मात्या, दिग्दर्शक व ॲनिमेटरचा शिवसेनेचे मुख्य  प्रतोद, आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते नुकताच  सत्कार करण्यात आला. 

फेरीकाऊज ॲनिमेशन स्टुडिओ निर्मित “राधा: द इटरनल मेलडी” या शॉर्ट ॲनिमेशन चित्रपटाला उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिनांक २६ ऑक्टोबर, २०२१ रोजी अत्यंत प्रतिष्ठेच्या ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेशन चित्रपट व सर्वोत्कृष्ट ऑडीओग्रॅफी असे पुरस्कार प्राप्त झाले. या वेळी चित्रपटाच्या निर्मात्या संगिता चौधरी, दिग्दर्शक बिमल पोद्दार, ॲनिमेटर नितीन खारकर, ध्वनी ऑलवीन रेगो, व संजय मौर्या अशा  तब्बल ५ जणांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

काल मंगळवारी शिवसेनेचे मुख्य प्रतोद, आमदार सुनिल प्रभु यांनी  या शॉर्ट ॲनिमेशन चित्रपटाचे निर्मात्या संगिता चौधरी, दिग्दर्शक बिमल पोद्दार व द्विमितीय व त्रिमितीय ॲनिमेटर नितीन खारकर यांचा सत्कार केला. यावेळी विधानसभा संघटक शालिनी सावंत, उपविभाग प्रमुख जितेंद्र वळवी, शिवसैनिक व सकल मराठा समाजाचे दीपक परब उपस्थित होते. नितीन खारकर हे जेष्ठ शिवसैनिक कै. रवींद्र खारकर यांचे चिरंजीव असून गोकुळधाम दिंडोशी येथील रहिवासी आहेत.

राधा ही दोन भिन्न पात्रांमधील प्रेम आणि त्याग याविषयी एक भावनिक उतार-चढाव आहे. एक वृद्ध आजी (राधा) आपल्या नातवाचे पालनपोषण करते आणि त्याच्यावर मनापासून प्रेम करते. नियतीने त्यांना कालांतराने वेगळे केले आणि त्यामुळे आता वेगळ्या शहरात राहणार्‍या नातवाला एक नजर पाहण्यासाठी आजीची तगमग सुरू होते. या मुकपटातील दृश्ये आणि संगीत फार बोलके आणि व्यक्त होणारे आहेत.

हिंदू पौराणिक कथेनुसार कृष्णाने तिला वृंदावनात सोडल्यानंतर राधाची प्रतीक्षा आणि ‘बिराह’ या दोन व्यक्तींमधील एक अदृश्य बंध या कथेत बांधला गेला आहे.

पोद्दार यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात व्हिज्युअलायझर म्हणून केली आणि अखेरीस त्यांनी स्वतःचा बुटीक स्टुडिओ, फेरीकाऊज ॲनिमेशन स्टुडिओ सुरू केला. राधा हा त्यांचा स्वतंत्र चित्रपट निर्माता/दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे. बेंगळुरू इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म सह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला पुरस्कार आणि निवड झाली आहे.

राधा सध्याच्या प्रत्येक घरातील एका वृद्ध, एकाकी स्त्रीचे प्रतिनिधित्व करते जिथे मुले चांगल्या भविष्यासाठी, करिअरसाठी आणि जीवनशैलीसाठी आपले घर, परिवार सोडतात. ज्यामुळे कुटुंबातील मोठी माणसे एकटे पडली आहेत आणि त्यांच्याकडे दुसरं काही उरले नाही, पण गेलेल्या दिवसांच्या आठवणी त्यांच्या भोवती पिंगा घालतात.

हा चित्रपट दोन पात्रांमधील प्रेम आणि स्नेहावर आधारित आहे. एखाद्याला गमावणे कठीण आहे आणि माणूस म्हणून आपण नेहमी पश्चात्ताप करतो किंवा जेव्हा ती व्यक्ती नसते तेव्हा आपल्या कृतीबद्दल पश्चात्ताप होतो. “आपण मुलगा/मुलगी, भाऊ/बहीण, वडील/आई आणि मित्र या नात्याचा आदर केला पाहिजे, पालनपोषण केले पाहिजे आणि नात्यांचे उत्सव साजरे केले पाहिजे. बिनशर्त आणि शुद्ध प्रेम कधीही मरत नाही, ते शाश्वत आहे. ज्यांच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्यांना आपण कधीही गमावत नाही; आम्ही त्यांना पाहू शकत नसतानाही ते आमच्या पाठीशी उभे असतात. जे आपल्यावर मनापासून प्रेम करतात ते आपल्याला कधीही सोडत नाहीत, अशा प्रेमाच्या दोन लोकांमधील चिरंतन बंध कधीही तुटत नाही,” हे या चित्रपटाचे सार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!