उदय सामंतांच्या बंगल्याबाहेर भाजयुमोच्या महिला कार्यकर्त्यांचं आंदोलन, विद्यापीठ कायद्याविरोधात आक्रमक

मुंबई- उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्या बाहेर भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी पहाटे ५ वाजल्यापासून आंदोलन सुरु केलं. विद्यापीठ कायद्याविरोधात भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी पहाटे ५ वाजता मंत्रालयासमोरील मंत्री उदय सामंत यांच्या घराबाहेर रांगोळी काढून निदर्शनं केली.
यावेळी पोस्टरवरून पोलीस आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी महिलांनी महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाही दिल्या. आंदोलनादरम्यान भाजप युवा महिला मोर्चाच्या काही महिला कार्यकर्त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला धमकी देत विद्यापीठ कायद्यात बदल न केल्यास आगामी काळात महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करु, असं सांगितलं.
महाविकास आघाडी सरकारनं हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत केल्यामुळं भाजपचे युवा कार्यकर्ते पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार विरोधात मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयाच्या समोर असलेला बंगल्या बाहेर आज पहाटे 5 वाजता भाजपाच्या युवा वतीने रांगोळी काढून आंदोलन करण्यात आलं.