उत्तर मुंबईत पत्रकार भवन उभारणार ; खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रकार संघाला दिले अभिवचन

मुंबई : उत्तर मुंबई या लोकसभा मतदारसंघात लवकरच पत्रकार भवन उभारण्यात येईल आणि त्यासाठी महाराष्ट्र सरकार, म्हाडा, मुंबई महानगरपालिका आदींच्या माध्यमातून योग्य अशा मध्यवर्ती ठिकाणी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येईल, असे सुस्पष्ट अभिवचन उत्तर मुंबई चे खासदार गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबई पत्रकार संघाला दिले.
उत्तर मुंबईत सुमारे दीडशे ते दोनशे पत्रकार वास्तव्यास आहेत. वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या यांचे पत्रकार मोठ्या प्रमाणावर इथे कार्यरत आहेत. बोरीवली, कांदिवली, मालाड, चारकोप, दहिसर, मागाठाणे असे सहा विधानसभा मतदारसंघ या उत्तर मुंबईत येतात. या ठिकाणी काही वर्षांपूर्वी उत्तर मुंबई पत्रकार संघ स्थापन करण्यात आला असून त्याची धर्मादाय आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्यात आली आहे. या सर्वच बाबींची कल्पना देऊन संघाचे अध्यक्ष विजय वैद्य, सरचिटणीस योगेश त्रिवेदी आणि कोषाध्यक्ष विनोद यादव यांनी पत्रकार भवन उभारण्यात यावे आणि जागा उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी करणारे एक निवेदन खासदार गोपाळ शेट्टी यांना दिले.
राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी प्रत्येक जिल्ह्यात एक पत्रकार भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे, ही बाबही पदाधिकाऱ्यांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिली. खासदार गोपाळ शेट्टी यांनी तातडीने हा प्रश्न हातात घेऊन पत्रकार भवन उभारण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले आहे.