स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर १५ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप..
जाधव कुटुंबियांच्या खात्यात प्रधान डीलर्स कंपनीकडून १५ कोटी रु.जमा -किरीट सोमय्या

मुंबई:- गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमैय्या हे भ्रष्टाचाराची नव-नवीन प्रकरणं समोर आणून अनेक नेत्यांच्या मागे लागले आहेत.अश्यात आता पुन्हा एकदा त्यांनी गौप्यस्फोट केला आहे.मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून १५ कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमैय्यांनी केला आहे.
या घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय व आयकर खात्यामार्फत चौकशी करावी, अशी मागणीच भारतीय जनता पार्टीचे किरीट सोमैय्या यांनी केली आहे.भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. मनीषा चौधरी यावेळी उपस्थित होत्या.
कोविड काळात मुंबई महापालिकेने महापौर किशोरी पेडणेकर यांच्याशी संबंधित कंपनीला कोविड उपचार केंद्र चालविण्याचे कंत्राट दिले गेले असल्याचे उघड झाले असून या काळात दिलेल्या कंत्राटांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावे,अशी मागणीही डॉ. सोमैय्या यांनी केली आहे.
सोमैय्या यांनी यावेळी यशवंत जाधव, आ.यामिनी जाधव व जाधव कुटुंबियांच्या खात्यात प्रधान डीलर्स या कंपनीच्या खात्यातून १५ कोटी रु. कसे पाठवण्यात आले याचा तपशील सादर केला. ते म्हणाले की, ‘प्रधान डीलर्स की कंपनी बोगस असल्याचे केंद्रीय कॉर्पोरेट मंत्रालय, अंमलबजावणी संचालनालय व आयकर खात्याने जाहीर केले आहे. अशा बोगस कंपनीचे शेअर्स ५०० रुपये प्रती शेअर खरेदी केल्याचे दाखवून जाधव कुटुंबियांच्या खात्यात १५ कोटी रु. इतकी रक्कम जमा करण्यात आली आहे’. या व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी आपण आयकर विभागाकडे तसेच अंमलबजावणी संचालनालयाकडे केली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापौर किशोरी पेडणेकर भागीदार असलेल्या किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला वरळी येथे कोविड उपचार केंद्र चालविण्याचे कंत्राट दिले गेले. कोविड उपचार केंद्रांच्या माध्यमातूनही मोठ्या रकमांचे गैरव्यवहार झाले असल्याने या कंत्राटांचे फॉरेन्सिक ऑडिट व्हावे अशी मागणीही डॉ. सोमैय्या यांनी केली.