शाळा, महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्यास मुख्यमंत्री सकारात्मक,आजच्या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीकडे राज्याचं लक्ष

मुंबई:- गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोना रुग्ण संख्येमध्ये वाढ झाल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील शाळा आणि महाविद्यालयात १५ फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या निर्णयाला शाळा व्यवस्थापन, संस्थाचालक आणि पालक वर्गाकडून विरोध झाला. हा विरोध पाहता शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला असल्याचं स्पष्ट केलं आहे.
याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत ते निर्णय घेतील अशी माहिती माध्यमांच्या हाती लागली आहे. अशात आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयात पार पडणार आहे.या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.
मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत शाळांबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांचा कोरोना अहवाल पाहिला तर कोरोना रुग्ण संख्येत काहीशी चढ-उतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शाळा सुरू होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.