मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर जनता त्रस्त : भर पावसात मुंबई पालिकेचे नळ कोरडे
लाच न मिळाल्याने अभियंते देईनात लक्ष

मुंबई / रमेश औताडे
भविष्यात पुढील २५ वर्षात मुंबईला किती पाणी लागेल, किती कोटी लिटरची गरज भासेल याचे आराखडे आखले जात आहेत. ते महत्त्वाचेच आहे. पण, आज आत्ता मुंबईतील मानखुर्द परिसरातील पी एम जी पी वसाहतीमधील काही इमारतीमधील नागरिक घरातील पालिकेच्या नळाला पाणी नाही म्हणून त्रस्त आहेत. महिला पाण्यासाठी भटकत असून काही पुरुष अंघोळ न करता नोकरीवर जाऊन कामाच्या ठिकाणी अंघोळ करत आहेत. मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या या भागातील वास्तव पाहिल्यास यासारखी दुर्दैवी घटना दुसरी कोणती नसेल असा सवाल या भागातील त्रस्त लाडक्या बहिणी करत आहे. मुंबई महानगर पालिका ही जगप्रसिद्ध पालिका. एका राज्याच्या अर्थसंकल्पाएवढा प्रचंड महसूल हाताळणारी. मात्र या पालिकेतील करदाताच, पाणी नसल्याने स्वतःच्या घरात अंघोळ न करता, कामाच्या ठिकाणी जाऊन अंघोळ करतो ही वस्तुस्थिती केवळ लाजिरवाणी आहे.
अशा वेळी मनसे, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, भाजप आणि काँग्रेस हे पक्ष पाण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून खुर्चीच्या राजकारणात अडकले आहेत, याबद्दल महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. “मुंबईत इतका पाऊस पडतोय, तलाव भरून वाहताहेत, तरीही आम्ही पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. आम्ही कर भरतो, चार पिढ्या इथे वास्तव करतो, तरी आमच्याच हक्काच्या पाण्यासाठी अशी अवस्था का व्हावी?” असा सवाल पाण्यापासून वंचित त्रस्त महिला करत आहेत. पाणी ही मूलभूत गरज असून, त्यावर राजकारण नको. सर्व पक्षांनी अंतर्मुख व्हावे. अशी मागणी होत आहे.