पालिका रुग्णालयांचा कंत्राटदाराकडून औषध पुरवठा बंद
१२० कोटी थकीत असल्याने घेतला निर्णय
मुंबई / रमेश औताडे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २७ रुग्णालयांना ऑल फूड अँड ड्रग लायसन्स होल्डर्स फाउंडेशन ने गेल्या चार वर्षात १२० कोटी रुपयांची औषधे सप्लाय केली होती. मात्र १२० कोटी रुपये गेल्या चार वर्षापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेने अद्याप दिले नसल्याने १३ जानेवारी २०२५ पासून औषध पुरवठा थांबवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सोमवारी दिली.
पालिकेच्या मध्यवर्ती खरेदी विभागाकडून निविदा प्रक्रिया किंवा दर करारांचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे रुग्णालयांना केवळ स्थानिक खरेदी आणि जुन्या दर करारावर आधारित पुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. सार्वजनिक पैशांचा कोट्यवधींचा अपव्यय होत आहे असे पांडे यांनी यावेळी सांगितले.
सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून, रुग्णसेवेवर गंभीर परिणाम होत आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विपिन शर्मा यांना हा विषय सोडवण्याचे निर्देश पालिका आयुक्त यांनी दिलेले आहेत. आम्ही लवकरात लवकर तोडगा निघेल अशी आशा व्यक्त करतो. मात्र आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्हाला औषध पुरवठा थांबवण्याचा निर्णय कायम ठेवावा लागेल असेही पांडे यांनी यावेळी सांगितले.