महाविद्यालयातील वादातून मागासवर्गीयांच्या वस्तीवर जमावाचा हल्ला, लहान मुले, महिलांना मारहाण

नांदेड:- महाविद्यालयात झालेल्या वादातून मागासवर्गीय वस्तीवर हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडला आहे. सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हल्लेखोर जमावाने नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात असलेल्या लहान गावातील मागासवर्गीय वस्तीवर हल्ला केला आहे.
फक्त महाविद्यालयात झालेल्या वादावादीतून हा हल्ला झाल्याचं बोलले जात आहे. तब्बल २०० ते ३०० लोकांचा जमावाने हा हल्ला केल्याचा इथल्या नागरिकांनी दावा केला आहे. हल्लेखोर जमावाने मोठ्या प्रमाणात दगडफेक करत या वस्तीत तोडफोड केली आहे. याशिवाय वस्तीतील महिला,वृद्ध, लहान मुलं यांनाही मारहाण करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ माजली असून सध्या या वस्तीत भीतीचे वातावरण आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून हल्लेखोरांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसंच या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे, याचाही पोलीस तपास करत आहेत.