नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांच्या नावाची मागणी करण्यासाठी 10 जून रोजी भव्य मानवी साखळी आंदोलन
सर्वपक्षीय कृती समितीची घोषणा

मुंबई,दि.८: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवंगत लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी, ओबीसी जनता सुरुवातीपासून करीत आहे. या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या 10 जून रोजी वरील जिल्ह्यात मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे, अशी घोषणा लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केली.
यासंबंधी माहिती देताना दशरथदादा यांनी सांगितले की, लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यासाठी यापूर्वी राज्य आणि केंद्र सरकारकडे विनंती करण्यात आली आहे. तरी देखील अचानकपणे 17 एप्रिल रोजी सिडकोच्या संचालक मंडळाने लोकभावनेचा विचार न करता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे वरील जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी ओबीसी जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हे सारे प्रकल्पग्रस्त तसेच सामाजिक व राजकीय संघटनांनी येत्या 10 जून रोजी भव्य मानवी साखळी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात हजारोंच्या संख्येने लोक सहभागी होणार असून सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.
यावेळी पत्रकारांना माहिती देताना माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले की, 2 जानेवारी 2015 रोजी खासदार कपिल पाटील यांनी लोकभावनेचा विचार करून लोकसभेत ही मागणी केली. त्या संबंधीचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे तत्कालीन अध्यक्ष व सध्याच्या मंत्रिमंडळातील सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्याकडे दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव दिला असता त्यांनी तो तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 19 जून 2018 रोजी पाठविला. फडणवीस साहेब यांनीसुद्धा तो प्रस्ताव उचित कार्यवाही करण्याच्या सूचनेसह प्रधान सचिव (विमानचालन) यांच्याकडे पाठविला होता. तसे 7 जुलै 2018 रोजी अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांनी लेखी कळविलेही होते. तसेच स्थानिक दहा गाव विमानतळ प्रकल्पबाधित संघटनेच्या वतीने व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सिडकोकडेही मागणीही केली होती. पण ही लोकभावना लक्षात न घेता सिडकोने आता जी कृती केली आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांमध्ये सिडकोविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे, असेही रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह सुरुवातीपासूनच प्रकल्पग्रस्त, शेतकरी, कष्टकरी जनता आणि राजकीय पक्षाचे नेते करीत आले आहेत. कारण दि. बा. पाटील यांची नवी मुंबई ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्रांना, प्रकल्पग्रस्तांना, कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संबंध आयुष्य वेचले आहे. 1984 साली शेतकऱ्यांच्या जमितीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या व साऱ्या देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातून शेतकऱ्यांना साडेबारा टक्के विकसित जमीन देण्याचे तत्त्व जे प्रस्थापित झाले ते पुढे संबंध महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना लागू झाले. त्यामुळे दि. बा. पाटील हे साऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे व प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते होते, अशी माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी पत्रकारांना दिली.
आपल्या बुलंद आवाजाने महाराष्ट्र विधीमंडळात तसेच खासदार म्हणून दिल्लीच्या सार्वभौम संसदेत शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न त्यांनी पोटतिडकीने मांडले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतर ओबीसी समाजात जागृती करण्यासाठी त्यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा प्रश्न अशा अनेक जनलढ्यात त्यांनी हिरीरीने भाग घेऊन तुरुंगवास भोगला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य नव्या पिढीला स्फूर्तिदायी ठरावे यासाठी त्यांच्या कर्मभूमीत त्यांची स्मृती जागरूक राहावी यासाठी नवी मुंबईत होत असलेल्या विमानतळाला त्यांचेच नाव द्यावे, अशी मागणी विविध पक्षांच्या नेत्यांनी सामाजिक संघटनांनी तसेच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार करून दि. बा. पाटील यांचेच नाव नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या पत्रकार परिषदेला आमदार महेश बालदी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे, लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय सर्वपक्षीय कृती समितीचे सहचिटणीस दीपक म्हात्रे, खजिनदार जे. डी. तांडेल, पनवेल महानगर पालिकेचे उपमहापौर व आरपीआय रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष जगदीश गायकवाड, कृती समितीच्या उरण विभागाचे संयोजक विनोद म्हात्रे, मेघनाथ म्हात्रे, नंदेश ठाकूर, संजय ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.