पत्नीपीडित पुरुषांचा राज्यस्तरीय मेळावा

मुंबई / रमेश औताडे
आयुष्याचा आधारवड मानलेल्या संसारातच अन्यायाचा सामना करताना अनेक पुरुष मानसिक, सामाजिक आणि कायदेशीर आघातांना तोंड देत आहेत. या वेदनेला आवाज देण्यासाठी पत्नीपीडित पुरुषांचा राज्यस्तरीय मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या पुरुषांनी आपले संघर्षमय अनुभव मांडले. काही पुरुषांचे डोळे त्यांच्या अन्यायाची कहाणी सांगत होते, तर काहींच्या आवाजात दडपलेली आर्त वेदना स्पष्ट जाणवत होती. संसार वाचवण्यासाठी प्रयत्न करतानाही खोट्या गुन्ह्यांचे खापर फोडले गेले, पोटगीच्या जाचक अटींनी उराशी घाव बसले, मानसिक छळाचा कहर झाला आहे. अशी जिव्हारी लागणारी कहाणी अनेक पुरुषांनी यावेळी मांडली.
या वेळी पत्नीपीडित पुरुष हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कायदेशीर मार्गदर्शनासह मानसिक आधार दिला आणि “न्याय मिळेपर्यंत एकजुटीने लढा देऊया” अशी भावनिक हाक दिली. मेळाव्यात पोटगीच्या अन्यायकारक अटी, खोटे गुन्हे दाखल करणे, महिलांसाठी असलेल्या कायद्यांचा गैरवापर याविरोधात ठाम आवाज उठला. या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. “पुरुषही माणूस आहे, त्यालाही भावना आहेत, त्याच्यावर होणाऱ्या जुलूमाविरुद्ध तोही लढणार” हा संदेश मेळाव्यातून देण्यात आला असून कुणाला मदत हवी असेल तर 9422395223 या मोबाईल वर संपर्क करा.