कोंकण

कोकणातील धुमशान

मित्रपक्षाच्या कोकणी नेत्याचे थोबाड फोडण्याचे जाहीर वक्तव्य

मुंबई – शाम देऊलकर

माणुसकीला काळिमा फासणारी भयंकर घटना नुकतीच बदलापूरला घडल्यामुळे गेले तीन दिवस राज्यभरातून अशाच प्रकारच्या घटनांच्या बातम्या तीव्रतेने समोर येत आहेत. अशा विविध घटनांमुळे महाराष्ट्र दररोज शब्दशः जखमी होत आहे. या भयंकर नकारात्मक वातावरणात चार दिवसांपूर्वीची एक महत्त्वाची राजकीय घडामोड काहीशी झाकोळली गेली. कोकण प्रांत हा पहिल्यापासून बुद्धिवंतांचा, विचारवंतांचा समजला जातो. परंतु नुकतेच शिंदे सरकारमधील एका तळकोकणी कॅबिनेट मंत्र्याने आपल्याच मित्रपक्षाच्या कोकणी नेत्याचे थोबाड फोडण्याचे जाहीर वक्तव्य केल्याचे विचित्र चित्र समोर आले आहे. त्याचे असे झाले की, मुंबई-गोवा महामार्गाच्या स्थितीवरून कोकणचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांनी जाहीररित्या आपली नाराजी व्यक्त केली. त्यांनी ‘हायवे’वरुन त्यांच्या स्टाईलने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा राजीनामाच मागितला.

खरं म्हटलं तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांना या हायवेमुळे आजतागायत विक्रमी त्रास सहन करावा लागला आहे. या हायवेवर बरेच लिहिले आणि बोलले गेले आहे. परंतु गेली 14 वर्ष हा हायवे अपूर्णच आहे. याचाच एक भाग म्हणून रामदास कदम यांनी गणेश चतुर्थीच्या तोंडावर वैतागातून चव्हाण यांच्या राजीनाम्याची मागणी केली. (वरकरणी मुंबई- गोवा हायवे हा मुद्दा वाटत असला तरी प्रत्यक्षात राजकीय कारण आहे.) पण सारासार विचार केला असता कदम याच्या मागणीत फारसे वावगे काही नव्हते. त्याचबरोबर चव्हाण यांना बोलणारे कदम चव्हाणांपेक्षा ज्येष्ठही आहेत. परंतु मंत्री रवींद्र चव्हाण यांनी यावर अनपेक्षित आक्रमक प्रत्युत्तर दिले. रामदास कदमांना ‘अडाणी’ म्हणून त्यांचे थेट थोबाड फोडण्याचे जाहीर वक्तव्य केले. विशेष म्हणजे कदम आणि चव्हाण यांचे दोन्ही पक्ष सत्तेत मित्रपक्ष म्हणून राज्याचा कारभार पाहत आहेत. असे असताना आपल्याच मित्रपक्षाच्या ज्येष्ठ नेत्याचे थोबाड फोडण्याचे वक्तव्य करण्याचे काहीच कारण नव्हते. पण हे वक्तव्य केले गेले.

मुळात रवींद्र चव्हाण यांची राजकिय वाटचाल कोकणातील भाजपमध्ये सर्वाधिक वेगाने झाली. फडणवीस सरकारमध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले होते. आता तर शिंदे सरकारमध्ये त्यांना सार्वजनिक बांधकाम खाते मिळाले आहे. ते असे मंत्री आहेत की, जे मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस या दोहोंच्या जवळचे आहेत. दोन वर्षांपूर्वी सुरत मोहिमेवरील त्यांची पडद्यामागची कामगिरी प्रभावी आणि परिणामकारक असल्याचे सांगितले जाते. पाच वर्षांपूर्वी मंत्री चव्हाण यांना डोंबिवलीतून भाजपच्या काहीजणांनी पुन्हा उमेदवारी देण्यासही विरोध केला होता. परंतु तो विरोध डावलून फडणवीसांनी त्यांना डोंबिवलीतूनच ‘सुभेदारी’ दिली. चव्हाण यांचे याआधीचे सार्वजनिक जीवनातील वागणे बऱ्यापैकी संयमी होते. परंतु कदमांच्या मागणीमुळे त्यांचे चित्त एकाएकी एवढे का खवळले, ते तपासणे औत्स्युक्याचे आहे. कॅबिनेट मंत्र्यांनी अशा टीकांना संयतपणे उत्तर देणे अपेक्षित असते. परंतु चव्हाणांना ते जमले नाही. उलट कदमांनी त्यांच्या कारकिर्दीत काय काय केले ते तपासावे लागेल, असे चव्हाण बोलले. सध्याचे राजकारण प्रचंड ईर्षेचे व स्पर्धचे झाले आहे. त्यात राजकारणात कोणीच साळसूद नसतं. हा बहुचर्चित हायवे केंद्राच्या अखत्यारीत येतो का, त्यात राज्य सरकारचा कुठे व कितपत संबंध येतो, या हायवेचे ठेकेदार कसे पळून गेले (का पळवून लावले), डागडुजी कोणाकडे आहे, किती टप्प्यात काम पूर्ण होणार आहे असल्या चर्चांमध्ये सामान्य लोकांना रस नाही.

राज्यासह देशभरात सगळीकडे रस्त्यांची कामे जलदगतीने होत असताना कोकणवासियांच्या नशिबी मात्र हा वनवास का ? हा साधा प्रश्न कोकणी लोकांना पडला आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तर या हायवेवर चित्रपट काढावा लागेल, असे सांगून या विषयाची एक प्रकारे टिंगलच उडवली. गोवा हायवेच्या या दशावतारामुळे कदमांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्यावर चव्हाणांनी हे ‘धुमशान’ केलं. खरंतर चव्हाणांचं राजकीय धुमशान गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीत सुरु असल्याचं कदमांचं म्हणणं आहे. ते या निमित्ताने ‘हायवे’वर आलं. कदमांच्या आमदारपुत्राला होणाऱ्या राजकीय त्रासावरून कदमांनी टीकेचा हा मार्ग स्वीकारल्याचे दिसते. कदम पिता-पुत्र, दुसरे मंत्री उदय सामंत, व सिंधुदुर्गातील मंत्री दीपक केसरकर या सर्वांना गेल्या काही वर्षांपासून रविंद्र चव्हाणांच्या डावपेचांना सामोरे जावे लागत आहे. गंमत म्हणजे हे सर्वजण सत्ताधारी महायुतीतीलच आहेत. अशाप्रकारे हे ‘कोकणी धुमशान’ अंतर्गत वादावादीतूनच झाले आहे. पुन्हा त्याला ‘राणे’ हा वेगळा अँगल आहेच. या सर्वाचीच परिणीती म्हणजे कदम-चव्हाण हा वाद आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!