राज्यात लसींचा तुटवडा, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती; केंद्राकडे डोस पुरवण्याची मागणी

मुंबई- देशासह राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात गेल्या तीन दिवसांपासून दिलासादायक चित्र पाहायला काल पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या २४ तासात राज्यात कोरोनाचे ४६ हजार ७२३ नवे रुग्ण आढळल़े आहेत. तर एकट्या मुंबईत दिवसभरात १६ हजार ४२० नवे रुग्ण आढळले आहेत.
रुग्णसंख्येतील वाढ कायम असल्याने जास्तीत जास्त लसीकरण करण्याकडे राज्य सरकारचा कल आहे. पात्र लोकसंख्येला शक्य तितक्या लवकर कोरोना डोस देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यातच लसीचा तुटवडा असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
‘महाराष्ट्रात कोवॅक्सिन लसीचा तुटवडा आहे. याबाबत आम्हाला अनेक जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांचे फोन येत आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सवर झालेल्या बैठकीमध्ये आम्ही राज्यातील लसीकरण वाढवण्यासाठी कोविशील्डच्या ५० लाख डोस आणि कोव्हॅक्सिनच्या ४० लाख डोसची मागणी केली आहे’, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.






