किराणा व सुपरमार्केटमधून वाईन विक्री निर्णयास मिळणार स्थगिती? शरद पवारांचे सूचक विधान,म्हणाले..

मुंबई- राज्यातील सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्यासाठी परवानगी देणारा निर्णय काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने घेतला. मात्र, आता या निर्णयाला सर्व स्तरांमधून विरोध होताना पाहायला मिळत आहे. हा निर्णय मागे घ्यावा यासाठी विरोधक आक्रमक झाले आहेत. दरम्यान यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फार चिंतेचा विषय नाही.जर अनेक स्तरातून विरोध होत असेल आणि राज्य सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे मला वाईट वाटण्याचे कारण नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
देशभरातील सर्वच राज्यांमध्ये दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारू मिळते. त्यामध्ये वाईनचा खप अत्यंत तुलनेने कमी आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. या जिल्ह्यामध्ये अठरा वाईनरी आहेत. १८ वायनरी उत्पादन घेतात. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे.
वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र, त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेगळा निर्णय घेतला तरी वाईट वाटायचे कारण नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत. सुपर मार्केटमधील वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकारच्या वतीनं मागं घेतला जाण्याच्या चर्चा यानिमित्तानं सुरु झाल्या आहेत.