गुहागरमध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकारांना दिला चले जावचा आदेश !

गुहागर :रत्नागिरी जिह्याच्या दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुहागरमध्ये मेळाव्यासाठी उपस्थित असलेल्या पत्रकारांना चक्क तेथून निघून जाण्याचे आदेश दिले;त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या चले जाव च्या घोषणेमुळे गुहागरमधील पत्रकारांमध्ये नाराजी असून त्यांनी याचा निषेध केला आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काल नियोजित वेळेपेक्षा तब्बल चार तासाने गुहागर येथील सभेला आले. या वेळी सभेच्या ठिकाणी पत्रकार उपस्थित होते पाटील यांनी सभेला सुरुवात होण्यापूर्वीच पत्रकारांनी येथून जावे, असा ‘चलेजाव’ चा आदेशच एकप्रकारे दिल्याने पत्रकारांना आश्चर्याचा धक्काच बसला.
गुहागर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सभा मोडकाआगर येथील पूजा मंगल कार्यालयात काल गुरूवारी दुपारी दीड वाजता आयोजित करण्यात आली होती. या सभेला राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील पत्रकारांना निमंत्रित केले होते. दुपारी दीड वाजता सुरु होणाऱ्या या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तब्बल चार तास उशिरा आले. त्यामुळे ही सभा संध्याकाळी ४:३० वाजता सुरु झाली. सभा सुरू होण्यापूर्वीच जयंत पाटील यांनी पत्रकारांना पाहून तुम्ही येथून जा, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ते सभेनंतर विचारा असे सांगून पत्रकारांना बाहेरचा रस्ता दाखविला.
मुळात या कार्यक्रमाला यावे असे निमंत्रण तालुका राष्ट्रवादीकडून देण्यात आले असताना पक्षाच्या वरिष्ठांकडून पत्रकारांना मिळालेल्या वागणूकीबाबत पत्रकारांनी नाराजी व्यक्त करून निषेध केला.