राजकीय भूमिका घेतल्याने अभिनेते किरण मानेंना ‘मुलगी झाली हो’ मालिकेतून काढलं; नेटकऱ्यांनी सुरू केली सपोर्ट मोहीम

मुंबई- अभिनेते किरण माने यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या लोकप्रिय मालिकेमध्ये साकारलेलं विलास पाटील हे पात्र घराघरांमध्ये पोहचलं आहे. किरण माने हे त्यांच्या भूमिकेबरोबरच सोशल मीडियावरील पोस्टमुळे सुद्धा चर्चेत असतात. ग्रामीण भाषेतील लहेजा त्यांच्या लेखणीमधून स्पष्टपणे जाणवतो. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात. मात्र, आता याच राजकीय भूमिकांमुळे ते अडचणी सापडले आहेत. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं समोर आलं आहे.
आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजक्या शब्दांमध्ये किरण मानेंनी मांडलेली मतं पोस्टच्या माध्यमातून व्हायरल होत असतात. या पोस्टवरुन अनेकदा त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केला जातो. त्यांचीही पोलखोल किरण माने करत असतात.
मात्र, अशाप्रकारे राजकीय भूमिका घेणं त्यांना महागात पडल्याचं चित्र दिसत आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.दरम्यान त्यांच्यासाठी नेटकऱ्यांनी ‘I SUPPORT KIRAN MANE’ ही मोहीम चालवली आहे.या मोहीमेला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार रोहीत पवार यांनी देखील प्रतिसाद देत अभिनेते किरण माने यांना पाठिंबा दिला आहे.