कोरोना बाधितांच्या विलगीकरणाच्या कालावधीत राज्य सरकारने केला ‘हा’मोठा बदल…

मुंबई- गेल्या २ वर्षांपासून कोरोनाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे.अश्यातच आपल्या राज्यात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आल्याचे चित्र दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. शिवाय, ओमायक्रॉन बाधित रूग्ण संख्येतही भर पडत आहे.
राज्यातील ही परिस्थिती पाहता राज्यसरकारने राज्यातील निर्बंध वाढवले असल्यामुळे नागरिकांची चिंता वाढली आहे. मात्र, दुसरीकडे राज्य सरकारने काहीसा दिलासा देखील दिला आहे. केंद्र सरकारने कोरोनाबाधित आढळल्यानंतर क्वारंटाईन किंवा विलगीकरणात राहण्याचा कालावधी कमी केल्यानंतर त्या धर्तीवर राज्य सरकारने देखील क्वारंटाईनच्या नियमांमध्ये बदल केला आहे.
क्वारंटाईनच्या कालावधीमध्ये बदल करून तो कमी करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज सकाळी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. केंद्र सरकारने आज क्वारंटाईनसंदर्भात नवी नियमावली जारी केली असून सौम्य किंवा लक्षणं नसलेल्या बाधितांसाठी ही नियमावली लागू करण्यात आली आहे.
या नविन नियमावलीनुसार राज्य सरकारने देखील नियमात काहीसा बदल केला आहे. ‘काही ठिकाणी १४ दिवस, काही ठिकाणी १० दिवस, काही ठिकाणी ८ दिवस असे क्वारंटाईन दिवस होते. पण आता सर्वानुमते क्वारंटाईन कालावधी ७ दिवसांचा ठेवण्याचा निर्णय झाला आहे’, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.