शंभूराजांवर आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण; उदय सामंतांची देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी

मुंबई : छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांचा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत समाचार घेतला. काही लोकांना प्रसिद्धीची हाव असते. चर्चेत राहण्यासाठी लोक उलटसुलट वक्तव्य करत असतात. मात्र छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व फार मोठे आहे. आमच्यासाठी ते दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर जर कोणी आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर अशांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पालकमंत्री उदय सामंत यांनी केली.
शासकीय विश्रामगृह माळनाका येथील पत्रकार परिषदेत सामंत बोलत होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर काही लोकांकडून जाणीवपूर्वक आक्षेपार्ह वक्तव्य होत आहेत. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे असल्याचे सामंत यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी सर्व शहरांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.संपूर्ण जिल्हा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्याचा आपला मानस असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले.