
सिंधुदुर्ग:- राणेंचा तोल गेलेला आहे कारण, आपण शुर आहोत असे राणे जरी दाखवत असले तरी ते पोलिसांना घाबरतात, ही वस्तूस्थिती आहे. म्हणून त्यांची पत्रकार परिषद ही कोणावर आरोप करण्यापेक्षा आपल्या मुलाला कसं वाचवता येईल यासाठी होती, अशी टीका दीपक केसरकर यांनी केली आहे.
प्रत्येक निवडणुकीला तुम्ही लोकांना धमक्या देणार आणि निवडून येणार हे विसरा आता. कोण दीपक केसरकर असं जर बघायचं असेल तर तुमच्या मुलाचा खासदारकीच्या निवडणुकीत झालेला पराभव आठवा, तुमचा स्वत:चा झालेला पराभव आठवा, असा टोला केसरकरांनी लगावला आहे.मी सर्वसामान्यांचं काम करू शकलो म्हणून मी जिंकलो, आज तुम्हाला जर माझ्याशी लढाई करायची असेल तर विकासाच्या मुद्द्यावर करा, असंही केसरकर म्हणाले आहेत.
माझा लढा तुमच्याशी आजिबात नाही. तुम्ही मला कितीही हिणावलं तरी सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की, तुमचा दहशतवाद मी मोडून काढला आहे, असा टीका देखील त्यांनी केली आहे. तुम्ही माझे व्यक्तीगत शत्रू कधीही नव्हता पुढेही राहणार नाही. आजपण तुमच्या मुलांना सांगतोय की सुधारा, आज सुधारला तर तुमचं जीवन शांततेत जाईल, असा सल्ला देखील त्यांनी दिला आहे.
तुमच्या राजकारणाचा जसा अंत झाला तसा तुमच्या मुलांचा होऊ देऊ नका. कोणताही कोकणातला मनुष्याचा कमी पणा व्हावा, असं मला कधीच वाटलं नाही, असंही ते म्हणाले.