Covid 19 स्पेशल ट्रेनची लूट थांबवा; ‘रेल रोको’चा इशारा
कुडाळ तालुका काँग्रेसप्रभारी तालुका अध्यक्ष अभय शिरसाट यांची मागणी

कुडाळ (सिंधुदुर्ग) : कोकण रेल्वेमार्गावरील कोव्हिड 19 स्पेशल ट्रेनच्या नावाखाली चालू असलेली लूट थांबवून नियमित गाड्या सोडाव्यात, अन्यथा याबाबत दखल न घेतल्यास एक महिन्यात राष्ट्रीय काँग्रेस रेल रोको आंदोलन करेल, असा इशारा कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिला याबाबतचे निवेदन कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांना येथील स्टेशन मास्तर यांच्यामार्फत देण्यात आले.
कोविड संसर्ग सुरू झाल्यापासून कोकण रेल्वे मार्गावर कोविड स्पेशल ट्रेनच्या नावाखाली प्रवाशांची लूट सुरू आहे. जवळजवळ बुकींगच्या सर्व तिकिटावर कोविडच्या नावाखाली 30 टक्के जादा अधिभार लावला जात आहे. ज्येष्ठ नागरिक, अपंग या घटकांना देण्यात येणारी सूट बंद करण्यात आली आहे. तुतारी व नेत्रावती सोडून सर्व रेल्वेचे तात्काळ बुकिंग बंद आहे. कोविड संसर्ग राज्यात कमी झाला असून सर्व आस्थापने पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी राज्याने दिली आहे. त्यामुळे सर्व निर्बंध उठले आहेत. या मार्गावर कोविड स्पेशल ट्रेन रद्द करून नियमित तिकीट बुकिंग व्हावे, अपंग व ज्येष्ठांना पूर्वीप्रमाणे रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये सवलत मिळावी, कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्यांना पूर्वीप्रमाणे तात्काळ कोटा द्यावा, मेंगलोर एक्सप्रेसला कुडाळ रेल्वे स्टेशनवर थांबा मिळावा. वरील मागण्यांचा विचार करून एक महिन्याच्या आत निर्णय घेऊन कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या जनतेला दिलासा द्यावा. याबाबत येत्या महिन्यात विचार न झाल्यास कोकण रेल्वे मार्गावर रेलरोको करण्यात येईल, असा इशारा कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने प्रभारी तालुका अध्यक्ष अभय शिरसाट यांनी दिला आहे.