
निवडणुकीच्या तोंडावर नियमबाह्य खरेदीसाठी मंत्र्यांचा दबाव
मुंबई – शाम देऊलकर
टेंडर प्रक्रियेत गडबड करून नियमबाह्य कोट्यावधीची औषधे मागवण्याचा घाट कामगार विमा रुग्णालयांमध्ये घातला जात आहे. आपल्या मर्जीतील ठराविक ठेकेदारांकडून ठराविक औषधांची यादी दस्तुरखुद्द आरोग्य मंत्र्यांनीच रुग्णालयांना दिली असून त्यानुसार मागणी नोदवण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकारी चक्रावले आहेत. निवडणूक निधी वसुलीची प्रक्रिया तर सुरू नाही ना, अशी चर्चा आरोग्य विभागात रंगली आहे.
राज्यात २० राज्य विमा कामगार रुग्णालये आहेत. त्याचे मुख्यालय लोअर परळ येथे आहे. या रुग्णालयात औषधे आणि इतर वैद्यकीय सामग्रीचा साठा दर तीन महिन्याला तपासून आवश्यकतेनुसार मागणी नोंदवली जाते. अपवादात्मक परिस्थितीत दोन तीन महिन्याचा अधिकचा साठा मागवला जातो. त्यामध्ये ३०० प्रकारची औषधे व सामग्रीचा समावेश त्यामध्ये आहे. दर तीन महिन्याला सुमारे १८ ते २० कोटींची औषधे व सामग्री लागते.
नियमित प्रक्रिया डावलण्यास एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला. तेव्हा विरोध करणाऱ्या क्लास वन अधिकाऱ्याची त्याच रात्री परस्पर उचल बांगडी केली. बदलीचा सरकारी आदेश देता नियमबाह्य बदली करून त्याच्या कनिष्ठ अधिकाऱ्यामार्फत हा साठा मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे आरोग्य संचालनालयात मोठी धांदल उडाली आहे. वरिष्ठ अधिकारी प्रचंड दबावत असल्याचे बोलले जात आहे.
विशेषतः १२ पैकी दहा दर – कंत्राट पुरवठादारांची मुदत येत्या ३१ ऑक्टोबरला संपत आहे. नवीन दर कंत्राट पुरवठादार यादी बनविण्याची प्रक्रिया दिल्लीतून केंद्रीय विभागाने सुरू केली आहे. तरी मुदत संपत असणाऱ्या मोजक्या मर्जीतील पुरवठादारांकडून वर्षभराचा साठा घेण्यासाठी मंत्र्यांकडून दबाव येत आहे. त्यामुळे यात मोठा भ्ष्टाचार होत असल्याची चर्चा आहे.
फक्त ७५ औषधांसाठी दबाव
निवडणुकीच्या तोंडावर आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयांच्या प्रमुखांना बोलावून सुमारे सव्वाशे कोटींची ठराविक ७५ औषधे प्रत्येकाने मागवलीच पाहिजेत अशी तंबी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. २४ सप्टेंबर रोजी मुख्यालयात ही बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी आधीची नियमित टेंडर प्रक्रिया आणि वर्क ऑर्डर तातडीने रद्द करण्यास सांगितले. तसेच तीन महिण्याऐवजी पुढील एक वर्षाचा साठा एकदाच मागवण्याच्या तोंडी सूचनाही त्यांनी दिल्या. आतापर्यंतच्या काळात अशी घटना कधीच घडली नसल्याने अधिकारी संभ्रमात आहेत.
घटनाक्रम…
* ७ ऑगस्ट रोजी जुलै ते डिसेंबर २०२४ पर्यंतचा साठा मागविण्याची रीतसर वर्क ऑर्डर देण्यात आली. ती २६ कोटींची होती.
* ही ऑर्डर रद्द करून वर्षभराच्या औषध साठ्याच्या नियमबाह्य खरेदीसाठी कामगार विमा रुग्णालयांचे मेडिकल डायरेक्टर डॉ. अलंकार खानविलकर यांच्यावर दबाव येत होता. त्यांनी दबाव झुगरला त्यामुळे त्यांची १८ सप्टेंबर रोजी तात्काळ बदली करण्यात आली. त्याचा चार्ज डॉ शशिकांत कोलनुरकर यांना देण्यात आला.
* १९ सप्टेंबर रोजी दिलेल्या सर्व प्रशासकीय वर्क ऑर्डर थांबवण्यात आल्या.
* २३ सप्टेंबर रोजी आधीच्या सर्व ऑर्डर रद्द करण्यात आल्या.
* २४ सप्टेंबर रोजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लोअर परेल येथे आयुक्तालयात मीटिंग घेऊन वर्षाचा साठा मागविण्याच्या सूचना दिल्या. मंत्र्यांच्या सूचनेनुसार कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
खालील कंपन्यांची सामग्री खरेदीसाठी दबाव
1. Tablets India Ltd.
2. Bajaj Healthcare Ltd.
3. Hindustan Laboratories
4. Zim Laboratories Ltd.
5. Johnson & Johnson Pvt Ltd.