रत्नागिरीत डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण; प्रशासन सतर्क
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील काही गावांमध्ये डेल्टा प्लस या कोरोनाच्या व्हेरिएंट अर्थात नव्या रूपाची लागण आढळून आल्यानेआणि या संसर्गाच्या महाराष्ट्रातील ७ रुग्णापैकी ५ रुग्ण संगमेश्वर मधील असल्याची माहिती पुढे येत असताना जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी याबाबत सोमवारी पत्रकार परिषद घेऊन माहिती देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रत्नागिरीबरोबरच मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबई, पालघर जिह्यांतही रुग्णांमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंट विषाणू आढळल्याने मुंबईकरांच्याही चिंतेतही भर पडली आहे.
हा म्युटंट स्ट्रेन परदेशातून संक्रमित झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ज्या गावांत हे रुग्ण सापडले ती गावे सील करण्यात आली आहेत. या गावांमध्ये परदेशातून नागरिक ये-जा करतात. त्यामुळे परदेशातून येणाऱया नागरिकांमधून हा स्ट्रेन संक्रमित झाल्याचा अंदाज वरिष्ठ आरोग्य अधिकाऱयांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूला गांभीर्याने घ्या. जर नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे योग्य पालन केले नाही तर पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढेल. हा विषाणू स्वतःला वाचविण्यासाठी आपले स्वरूप बदलत आहे. याआधी हिंदुस्थानात डेल्टा विषाणूचे संसर्गित रुग्ण आढळून आले होते. पुन्हा या विषाणूने आपले स्वरूप काही प्रमाणात बदलले असून हा डेल्टा व्हायरसपेक्षाही अधिक वेगाने संसर्ग पसरवू शकतो. त्यामुळे तिसऱया लाटेचा धोका संभवत असून याबाबत गांभीर्याने पावले उचलावी लागतील, असा इशारा दिल्लीतील एम्सचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी दिला आहे