‘बाल आधार’ नोंदणीतील त्रुटींनी पालक त्रस्त; कागदपत्रे जुळवताना मोठे आव्हान, UIDAI कडे तातडीने उपाययोजनेची मागणी

मुंबई:(संदीप सावंत)लहान मुलांच्या नवीन आधार नोंदणी प्रक्रियेत कागदपत्रांमधील विसंगतीमुळे पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. जन्म दाखल्यावरील नावातील त्रुटी, वडिलांचे-आईचे नाव किंवा पत्त्यातील फरक यामुळे अनेक नागरिकांची ‘बाल आधार’ नोंदणी अडकून पडली आहे. मूळ कागदपत्रांमधील चुकांकडे दुर्लक्ष केल्याने आता आधार कार्ड काढताना मोठी डोकेदुखी वाढली आहे. लहान मुलांच्या आधार कार्डावर (Baal Aadhaar) मुलाचे नाव वडिलांच्या नावासह आडनावासहित तसेच आई-वडिलांचे नाव आधार क्रमांकाला जोडलेले असणे आवश्यक आहे. मात्र, अनेक पालकांच्या जन्म दाखल्यात नाव अपूर्ण आहे किंवा आई-वडिलांच्या आधार कार्डावर असलेली नावे आणि जन्म दाखल्यावरील नावांमध्ये फरक आढळत आहे.
पालकांसमोर मोठे प्रश्नचिन्ह
नावातील किंवा पत्त्यातील किरकोळ फरकांमुळे आधार नोंदणी केंद्रावर कागदपत्रे स्वीकारली जात नाहीत. यामुळे पालक मोठ्या संभ्रमात आहेत: कोणती कागदपत्रे जोडावी? – जन्म दाखल्यातील त्रुटी आणि वडिलांच्या नावातील फरक असल्यास, नेमका कोणता पुरावा द्यावा, हा प्रश्न पालकांना भेडसावत आहे. जन्म दाखल्यात बदल कसा करावा? – मूळ जन्म दाखल्यातील चूक सुधारण्यासाठी सरकारी कार्यालयात कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते, याबद्दल पालकांना योग्य माहिती मिळत नाही. आधार कार्डमध्ये बदल (Update) कसा करावा? – मुलाच्या आधार नोंदणीसाठी पालकांच्या आधारमध्ये नाव किंवा पत्ता बदलायचा असल्यास कोणते कागदपत्रे लागतील? या गुंतागुंतीमुळे, सामान्य नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून आधार नोंदणी प्रक्रिया अत्यंत जिकिरीची बनली आहे.
UIDAI कडे तातडीने उपाययोजनेची मागणी
महाराष्ट्र व्हिएलई संवाद (Maharashtra VLE Samwad) या संघटनेने नागरिकांची ही गंभीर समस्या आधार प्रशासनाकडे (UIDAI) ई-मेलद्वारे मांडली आहे. त्यांनी प्रशासनाला विनंती केली आहे की, या समस्येवर तातडीने सुसंगत आणि सुलभ उपाययोजना जाहीर करावी. नावातील किरकोळ त्रुटींसाठी किंवा जुन्या कागदपत्रांमधील विसंगतींसाठी पर्यायी कागदपत्रे (जसे की शपथपत्र/Affidavit) स्वीकारण्याची तात्पुरती व्यवस्था करावी, जेणेकरून बाल आधार प्रक्रिया सुलभ होऊन पालकांना दिलासा मिळेल.
पालकांसाठी महत्त्वाचा सल्ला:
प्रथम जन्म दाखला दुरुस्त करा: आधार नोंदणीपूर्वी, आपल्या मुलाच्या जन्म दाखल्यातील (Birth Certificate) नाव आणि आई-वडिलांच्या नावाचे स्पेलिंग हे आई-वडिलांच्या आधार कार्डाशी पूर्णपणे जुळते याची खात्री करा. जुळत नसल्यास, जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयात जाऊन आवश्यक दुरुस्ती त्वरित करून घ्या. पालकांचे आधार अपडेट करा: मुलाच्या नोंदीसाठी आई-वडिलांच्या आधार कार्डावरील पत्ता, नाव किंवा आडनाव अद्ययावत करण्याची गरज असल्यास, ते करून घ्या. यासाठी UIDAI ने नमूद केलेली वैध कागदपत्रे (उदा. पासपोर्ट, पॅन कार्ड इ.) वापरावी लागतील.