पोलीस कॉन्स्टेबल झाली ‘मिस महाराष्ट्र’; बीडमधील शेतकऱ्याच्या लेकीने केली कमाल

बीड- प्रयत्नांती परमेश्वर हे पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने करून दाखविले आहे. बीडमध्ये महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या आणि एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या प्रतिभा सांगळे यांनी मिस महाराष्ट्राचा किताब पटकावला आहे. कुस्तीपटू, पोलीस दल आणि मिस महाराष्ट्र असा सांगळे यांचा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.
बीडच्या पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या प्रतिभा सांगळे या मिस महाराष्ट्र ही स्पर्धा जिंकल्यानंतर सध्या राज्यभरात चर्चेत आहेत. पोलीस दलात कार्यरत असतानाच त्यांनी मिस महाराष्ट्र हा किताब पटकावलाय. प्रतिभा सांगळे या मूळच्या आष्टी तालुक्यातील असून त्या २०१० सालापासून बीडच्या पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या त्या पोलीस मुख्यालयात महिला कॉन्स्टेबल म्हणून कर्तव्य बजावत आहेत.
प्रतिभा यांना मागील अनेक वर्षांपासून एखाद्या सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. त्या आपल्या इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्यासाठी बराच प्रयत्न करत होत्या. अखेर त्यांनी डिसेंबरच्या अखेरीस पुण्यात पार पडलेल्या स्पर्धेमध्ये फर्स्ट रनर अपचा किताब पटकावत मिस महाराष्ट्रा स्पर्धेपर्यंत आणि तिथून पुढे थेट जेतेपदापर्यंत मजल मारली आहे. केवळ पोलीस दलच नाही तर सांगळे यांनी कुस्तीचे मैदानही चांगल्या प्रकारे गाजवले आहे. यापुढे मिस इंडिया युनिव्हर्सचे स्वप्न उराशी बाळगून प्रतिभा यांनी आपली तयारी पुढे सुरू ठेवली आहे.