कोंकणमहाराष्ट्रमुंबईराजकीय

पंतप्रधानांनी आपल्या भाषणात अतिवृष्टी आणि पुराबाबत चकार शब्द काढला नाही: हर्षवर्धन सपकाळ

नवी मुंबई विमानतळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने पंतप्रधानांनी दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही!

मुंबई हल्ल्यातील आरोपीला काँग्रेस सरकारने फाशी दिली पुलवामा हल्ल्यातील आरोपी कुठे आहेत?

मुंबई : महाराष्ट्रातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुराने उद्ध्वस्त झाला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भव्य दिव्य कार्यक्रमात विमानतळाचे उद्घाटन करून आपली प्रसिद्धीझोतात राहण्याची हौस भागवून घेतली, मात्र पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत चकार शब्द काढला नाही. पंतप्रधानांना जनतेच्या जगण्या मरण्यापेक्षा निवडणुकांची आणि प्रसिद्धीची जास्त काळजी आहे, हे आज पुन्हा दिसून आले अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले आणि आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी स्वत:ची स्तुती केली. काम पूर्ण न झालेल्या विमानतळाचे उद्घाटन सोहळ्यातही त्यांनी काँग्रेसवर टीका करण्यातच धन्यता मानली. पण नवी मुंबई विमानतळाला स्व. दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. नवी मुंबई विमानताळाला स्वत:चे नाव द्यायचे असल्याने त्यांनी दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची घोषणा केली नाही. वर्षाला २ कोटी रोजगार, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, शेतकऱ्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचं वचन, १०० स्मार्ट सिटी उभा करण्याचे आश्वासन याचे काय झाले ते मात्र पंतप्रधानांनी सांगितले नाही.

पंतप्रधानानी काँग्रेसवर टीका केली पण याच काँग्रेसच्या सरकारने पाकिस्तानचे दोन टुकडे केले होते. काँग्रेस सरकारने मुंबई हल्ल्याच्या आरोपींना फाशी दिली. पण मोदी सरकारने पाकिस्तानच्या आयएसआयला पठाणकोठ हल्ल्याच्या तपासासाठी देशात बोलावले होते. ३०० किलो आरडीक्स घेऊन अतिरेक्यांनी पुलवामात हल्ला केला, मोदी सरकार त्यांना पकडू शकले नाही. पहलगाम हल्ला सर्वांना माहित आहेच त्यामुळे मोदींनी काँग्रेसवर टीका करण्याऐवजी अमेरिकेला घाबरून ऑपरेशन सिंदूर का थांबवले याचे उत्तर द्यावे. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर जबाबदारीने बोलावे आणि वागावे अशी अपेक्षा असते पण मोदी बेजबाबदार पणे बोलून आणि वागून राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याचा वापर राजकीय फायद्यासाठी करून पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग करतात हा अधर्म आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

१० वर्षापूर्वी पंतप्रधानांनी बिहार निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत येऊन इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजन केले होते, त्याचे काम अद्याप पूर्ण झाले नाही. २०१७ साली मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले होते त्याचे कामही अद्याप सुरु नाही. आज उद्घाटन केलेल्या नवी मुंबई विमानतळाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही, तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असल्याने उद्घाटनाची घाई केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!