
मुंबई:नवसाला पावणारा बाप्पा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा मंडपात आज बातमीदारी करणाऱ्या एबीपी माझा च्या पत्रकाराला पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी एखाद्या गुंडाप्रमाणे अरेरावी करत धक्का देत बाहेर काढले .
स्वत: मास्क न घालता संजय निकम यांनी एबीपी माझा चे पत्रकार अभिषेक मुठाळ यांना धक्काबुक्की केली. मीडियाकर्मींनी पोलीस निरीक्षक संजय निकम यांना प्रेमाने, समजुतीने बोलण्यासं सांगितलं, त्यावेळी त्यांना पारा आणखी चढला. धक्काबुक्की करताना पत्रकारांनी संजय निकम यांना हात लावू नका असं बजावलं. त्यावेळी या अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो थांब अशी गुंडगिरीची भाषा केली. पोलिसांच्या या वर्तनामुळे राज्याचे गृहखात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कायदा राखणाऱ्यांनी अरेरावी केली तर विचारायचं कुणाला हा प्रश्न सर्वसामान्यांना आहे. याप्रकरणाचा आम्ही निषेध करतो, झाल्याप्रकाराची चौकशी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी करावी, मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावं अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.माध्यमं आपलं काम करत होते. जास्त गर्दी नव्हती. त्यांच्याकडे पासेस होते. अशावेळी त्यांना मारहाण, धक्काबुक्की करणं योग्य नाही. माध्यमांवर दबाव निर्माण करण्याचं काम हे सरकार करत आहे. मागील दोन वर्षांपासून असे प्रकार सुरु आहेत. इतकी दंडुकेशाही योग्य नाही. याची दखल सरकारने घेतली पाहिजे. कारवाई तर झालीच पाहिजे पण अशाप्रकारे दंडुकेशाहीच्या जोरावर जर आपण कायदा आणि सुव्यवस्थेच्या गप्पा मारत असू तर ते काही योग्य नाही. अतिशय चुकीचं हे वर्तन आहे आणि याबाबत कारवाई झाली पाहिजे’, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.