लग्नाचे वय २१ केले तर मुली अश्लील व्हिडिओ पाहतील,या खासदाराची जीभ घसरली

उत्तरप्रदेश:- मोदी सरकारने मुलींच्या विवाहाचं वय हे १८ वरुन २१ वर नेण्याचा निर्णय घेतला आहे. आता यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर विवाहासाठी मुलींचे किमान वय १८ वरून २१ वर्ष करणारं विधेयक सरकार याच अधिवेशनात आणणार आहे. गुरुवारी केंद्रीय कॅबिनेटने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
दरम्यान, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी पाठोपाठ आता समाजवादी पक्षाच्या खासदाराने यावर प्रतिक्रिया देताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. समाजवादी पक्षाचे खासदार एसटी हसन यांनी, मला वाटतं की, जर मुलगी समजदार असेल तर तिचं लग्न १६ व्या वर्षी केलं तरी त्यात काही गैर नाही असे वादग्रस्त विधान केले आहे. असे सांगत असतानाच या पुढे, ‘लग्नाला उशीर झाला तर त्या मुली अश्लील व्हिडीओ किंवा पोर्नोग्राफी पाहत बसतील, घाणेरडे चित्रपट पाहतील आणि हे सगळं व्यर्थ आहे. त्यामुळे मुली वयात आल्यावर त्यांचं लग्न करायला हवे’, असे हसन यांनी म्हटले आहे.
तसेच ‘जर मुलगी १८ व्या वर्षी मतदान करू शकते, तर ती लग्न का करू शकत नाही?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यासोबतच, हसन यांनी ‘जर लग्न लवकर झालं तर त्या मुलीला लवकर मुलं होऊ शकतात, कारण प्रजननक्षमतेचे वय १५ ते ३० वर्षे आहे. अशा स्थितीत लग्नाचे वय वाढवू नये’ असे म्हटले आहे. आता त्यांच्या या विधानावरून नव्या चर्चेला उधाण येणार आहे