मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते धर्मवीर 2 चे पोस्टर लाँच

मुंबई – महाराष्ट्रासह देशभरात धुमाकूळ घालत धर्मवीर आनंद दिघेंच्या जीवनावर आधारित धर्मवीर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तसेच, प्रेक्षणासोबतच परीक्षकांनीही या सिनेमाचे कौतुक केले होते. पण ज्या प्रकारे या सिनेमाचा शेवट होतो, त्यानंतर याचा दुसरा भाग कधी येणार? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अखेर प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ चे पोस्टर लाँच करत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला ९ ऑस्टपासून येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा फक्त मराठीतच नव्हे तर हिंदी भाषेत जगभरात प्रदर्शित करण्यात येणार आहे.
9 ऑगस्ट रोजी, क्रांती दिनाचे औचित्य साधून प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता बॉबी देओल, सुप्रसिद्ध दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, महेश मांजरेकर आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या उपस्थित मोठ्या दिमाखात पार पडला.
‘धर्मवीर 2’ या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन अशी चौफेर भूमिका प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. तर मराठीतील नावाजलेले सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले आहे. गेल्या वर्षी 2023च्या नोव्हेंबर महिन्यात या सिनेमाचे चित्रीकरण सुरू करण्यात आले होते. ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला होता. अभिनेता प्रसाद ओक याने साकारलेली आनंद दिघेंची भूमिका अप्रतिम साकारलेली होती. या सिनेमाला अनेक पुरस्कारांनीदेखील गौरवण्यात आले होते.
‘धर्मवीर 2’ सिनेमाच्या पोस्टरवर करारी नजर असलेले आनंद दिघे झोपाळ्यावर बसलेले दिसत आहेत. तर, ‘हिंदुत्त्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही’ अशी ओळही नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता कमालीची उत्सुकता या पोस्टरमुळे निर्माण झाली आहे. मराठीसह हा सिनेमा हिंदीतही प्रदर्शित केला जाणार असल्याने ‘धर्मवीर 2’ आता जगभरात पोहोचणार आहे. ‘धर्मवीर’ या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मिळालेला तुफान प्रतिसाद पाहता ‘धर्मवीर 2’ पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करेल, अशी आशा सिनेमाच्या निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.