महाराष्ट्रमुंबई

प्रगतिशील उद्योगपतींनीच भारतीय उद्योजकतेचा पाया रचला – कुमार केतकर

ठाणे : प्रगत विचारसरणीच्या सामाजिक भान असलेल्या उद्योगपतींनी आपल्या विचारसरणीवर ठाम राहात भारतीय उद्योजकतेचा पाया रचला, असं प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि राज्यसभेचे माजी खासदार कुमार केतकर यांनी मुंबईत केलं. ‘यांत्रिकाच्या सावल्या’ या प्रज्ञा जांभेकर लिखित आणि सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या पुस्तकाची प्रस्तावना त्यांनीच लिहिली आहे. किर्लोस्कर उद्योग समूहाचे माजी महाव्यवस्थापक आणि त्यांचे पहिले इंजीनिअर शंभोराव जांभेकर, त्यांच्या पत्नी गंगाबाई, त्यांचे चिरंजीव आणि कम्युनिस्ट नेते आणि संपादक रामकृष्ण जांभेकर तसंच त्यांच्या पत्नी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या पहिल्या महिला सदस्य सुहासिनी जांभेकर यांच्या कार्यकतृत्वाचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. ‘यांत्रिकाच्या सावल्या’ या प्रज्ञा जांभेकर लिखित आणि सदामंगल पब्लिकेशन प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार-पत्रकार कुमार केतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सोबत ज्येष्ठ पत्रकार लेखक विनय हर्डीकर , सारस्वत बँकेच अध्यक्ष गौतम ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण आणि लेखिका प्रज्ञा जांभेकर उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक विनय हर्डीकर तसंच सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आर्थिक विकासातून सामाजिक योगदान देणं हे दुर्मीळ असून महिंद्रा आणि किर्लोस्कर समूहानं ज्ञानाधिष्ठित सुशिक्षित भांडवलशाहीच्या मॉडेलप्रमाणे उद्योगांचं जाळं देशात तयार केलं, असं हर्डीकर यावेळी म्हणाले. तर भारतीय उद्योजकतेचा सगळा दीडशे- दोनशे वर्षांचा कॅनवास या पुस्तकातून आपल्यासमोर जशाच्या तसा उभा राहतो असं मत ठाकूर यांनी व्यक्त केलं. तर वारसा हा फक्त वस्तू, वास्तू आणि विचारांचा नसतो, त्याही पुढे जाऊन तो रक्ताच्या वा सख्ख्या नात्यांना नसतो तर तो असतो विचारांचा आणि कार्यकतृत्याचा असं पुस्तकाच्या लेखिका प्रज्ञा जांभेकर यांनी सांगितलं. भूपेश गुप्ता भवन इथं झालेल्या या समारंभाला पुस्तकाच्या निर्मितीत मोलाचं योगदान दिलेल्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन पत्रकार आणि संपादक संदीप चव्हाण यांनी केलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!