मुंबई

‘वंदे भारत ट्रेन’च्या माध्यमातून विकसित देशातील सुविधा उपलब्ध 

पुणे – वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन ही भारताची शान असून विकसित देशातील प्रवाशांना ज्या प्रकारच्या प्रवासाच्या सुविधा मिळतात त्या सर्व सुविधा भारतीयांना या ट्रेनमधून मिळत आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणाली पद्धत्तीने हिरवा झेंडा दाखवून पुणे- हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पुणे रेल्वे स्थानक येथे आयोजित कार्यक्रमानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, खासदार मेधा कुलकर्णी, आमदार सुनील कांबळे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, पुणे मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला पुणे- हुबळी, पुणे- कोल्हापूर आणि नागपूर सिकंदराबाद या तीन वंदे भारत रेल्वेची भेट दिली आहे. यामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांचा प्रवास गतिमान आणि सुखकर होणार आहे. ही भारताने स्वत: आपल्या देशात तयार केलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची ट्रेन आहे, असेही ते म्हणाले. तत्पूर्वी केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ म्हणाले की, देशामध्ये १६ वंदे भारत ट्रेनचे लोकार्पण होत असताना महाराष्ट्रात तीन आणि पुण्यासाठी दोन ट्रेन सुरू होत असल्याची पुणे शहरासाठी आनंदाची बाब आहे. गेल्या दहा वर्षात रेल्वेच्या विकासासाठी २३ लाख ६४ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामध्ये नवीन रेल्वे स्थानकांची कामे, अमृत योजना, आदर्श रेल्वे स्थानक आदी अनेक कामे सुरू असून जवळपास १ हजार ६४ स्थानकांचा कायापालट त्यांच्या नवीनीकरणाच्या कामातून होत आहे, असेही ते म्हणाले.

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी पुढे सांगितले, पुणे- लोणावळा तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गिकेचे कामही लवकरच सुरू होईल. त्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रत्येकी २ हजार ५०० कोटी रुपये देणार असून त्यामुळे पुणे-मुंबई प्रवासातील वेळ तर कमी करण्यासाठी उपयुक्त होणार आहे. पुणे ते दिल्ली स्लीपर वंदे भारत ट्रेनबाबतही केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्थानकाची जागा अपुरी पडत असल्यामुळे पुढील काळात ऊरुळी कांचन येथे भव्य हार्बर टर्मिनल उभे करण्याबाबतचा आराखडा करण्यात आला असून लवकरच याबाबत कार्यवाही सुरू होईल, असेही ते म्हणाले.

मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील म्हणाले, ही रेल्वेच्या महाराष्ट्राच्या इतिहासात ऐतिहासिक घटना आहे. पुणे- कोल्हापूर आणि पुणे- हुबळी वंदे भारत ट्रेन मुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे ते कोल्हापूर पट्ट्याला मोठा फायदा होणार आहे. या पट्ट्यात प्रचंड सहकारी चळवळ, उद्योग, शैक्षणिक संस्था असल्यामुळे एकाच दिवसात कोल्हापूरहून पुणे आणि पुण्याहून कोल्हापूर असे कामकाज करुन परत येणे शक्य होणार आहे. चांगला वेग, दिसायला आकर्षक, प्रवाशांना प्रवासाचा आनंद देणारी आणि उच्च दर्जाचे खाद्यपदार्थ असलेली ही रेल्वे आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!