रेल्वे ने विशेष गाड्यांच्या नावाने चालविलेली लूट थांबवावी: रेल्वे प्रवाश्यांची मागणी
वरिष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत सुरु करावी

मुंबई:गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावा च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली होती.मात्र कोरोना ची पहिली लाट ओसरल्यानंतर रेल्वे सेवा बऱ्याच प्रमाणात पूर्ववत करण्यात आली, मात्र रेल्वे गाड्या सुरु होऊन एक वर्ष लोटले तरी देखील सुरु असलेल्या सर्व रेल्वेगाड्या या विशेष गाड्या म्हणून चालवण्यात येत आहेत. लसीकरण झालेल्या प्रवाशांना मेल-एक्स्प्रेसमधून प्रवासाला आणि पर्यटनाला मुभा असल्याने विशेष रेल्वेगाड्यांना चांगली मागणी आहे.त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विशेष शुल्काच्या नावाखाली बंद केलेल्या सवलती तात्काळ लागू कराव्या आणि सामान्य शुल्काप्रमाणे प्रवासी भाडे वसूल करावे, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.या शिवाय वरिष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत देखील पुन्हा सुरु करावी अशी मागणी केलेली आहे.
कोरोना चे निर्बंध अद्यापही पूर्णपणे उठले नसल्या कारणाने अनेकांच्या कमाईवर मर्यादा आल्या आहेत. अनलॉकमध्ये अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.मात्र सामान्य लोकांची अर्थव्यवस्था अजूनही रुळावर आलेली नाही. . कामानिमित्त आंतरशहर, आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.यामुळेआता पूर्वीच्या दराप्रमाणे भाडे आकारण्याची प्रवाशांची मागणी आहे. प्रवाशांना मिळणाऱ्या सर्व सवलती देखील बंद केल्या आहेत. कोरोनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता रेल्वेने विशेष शुल्क रद्द करत सामान्य शुल्क आणि सवलती सुरू कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.