रामदास कदम अनिल परबांवर भडकले,म्हणाले अनिल परब गद्दार..

मुंबई:- आज शिवसेनेचे जेष्ठ नेते रामदास कदम यांनी खळबळजनक पत्रकार परिषद घेत शिवसेनेचेच मंत्री अनिल परब यांच्यावर टिकास्त्र डागलंय. रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप काही दिवसांपूर्वी व्हायरल झाली होती. या क्लिपमधून ते अनिल परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचं ऐकू येत होतं. ही क्लिप व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यावर रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना ही क्लिप आपली नसून कुणाचं तरी हे षडयंत्रं असल्याचं म्हटलं होतं.
दरम्यान या कथित ऑडिओ क्लिपवरून सुरू झालेला वाद आता टोकाला गेलाय.आज रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीत पाठवण्यात अनिल परब यांचा हात असल्याचे सांगत ‘अनिल परब हे शिवसेनेचे गद्दार आहेत,ते शिवसेना संपवायला निघाले आहेत’, अशी जहरी टिका मंत्री अनिल परब यांच्यावर केली आहे.तसंच उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यावरही त्यांनी आगपाखड केली आहे. उदय सामंत यांच्याबाबत बोलताना, मी गेले ५२ वर्ष शिवसेनेचं काम करत आहे. शिवसेनेबाबतची निष्ठा आमच्या रक्तात भरली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत ३२ वर्ष मी आमदार होतो. असं सगळं असताना उदय सामंत यांच्याकडून मी पक्षनिष्ठा शिकायची का?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आज पत्रकारांशी बोलताना रामदास कदम हे गहिवरले होते. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले होते.असे असतानाही त्यांच्या विरोधात तिकीट कापल्याचे सांगत अपप्रचार झाल्याचा आरोप करत त्यांनी अनिल परब यांच्यावर केला.तसंच माझे कार्यकर्ते,कुटुंबीय, पदाधिकारी मिळून पुढची दिशा ठरवणार असल्याचा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.